ऐतिहासिक निर्णय: आता अमावस्येला होणार कांद्याचा लिलाव, लासलगाव बाजार समितीचा निर्णय
X
आशिया खंडातील कांद्याची प्रसिद्ध असलेली बाजारपेठ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत अमावस्येच्या दिवशी लिलाव बंद ठेवण्यात येत होते. मात्र, ७५ वर्षात प्रथमच अमावस्येच्या दिवशीही कांद्याचे लिलाव सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचा व प्रत्येक शनिवारी दिवसभर कांदा लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात बाजार समितीचे सभापती सुवर्णा जगताप आणि लासलगांव मर्चन्टस् असोशिएशनचे अध्यक्ष नंदकुमार डागा यांनी माहिती दिली आहे.
सध्या बाजार समितीच्या बाजार आवारांवर उन्हाळ (रब्बी) कांदा विक्रीस येत असुन पुढील हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी बांधवांना पैशांची आवश्यकता असल्याने अनेक शेतकरी बांधव त्यांच्याकडील कांद्याची विक्री करण्यासाठी घाई करत आहेत.
तसेच बाजार समितीच्या गेल्या अनेक दिवसांच्या मागणीचा विचार करून येत्या अमावस्येपासुन प्रत्येक अमावस्येला सकाळच्या सत्रात व प्रत्येक शनिवारी दिवसभर कांदा लिलाव सुरू करण्याचा सकारात्मक निर्णय लासलगांव मर्चन्टस् असोशिएशनच्या सभासदांनी घेतला आहे.