कुळकायद्यासारखे हक्क अधिकार नष्ट करण्याचे काम मोदी सरकार करतेय :जयंत पाटील
X
केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशात रान उठले असून या देशविघातक धोरणांना विरोध दर्शविण्यासाठी दि.26 नोव्हेंबर (संविधान गौरव दिनी ) रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या लढ्यात शेतकरी कामगार पक्षांसह कामगार संघटना , शेतकरी संघटना मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी शेकापक्षाच्या नेतृत्वात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली जाणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली ताकत दाखवा असे आवाहन जयंत पाटील यांनी पालीत केले.
भारत बंद आंदोलनाच्या पाश्वभूमीवर शेकाप सरचिटणीस, आ.जयंत पाटील पूर्ण जिल्ह्यांत फिरून जनजागृती पर सभा घेत आहेत, रविवारी दि.(22) रोजी पालीतील सभेत ते बोलत होते. आ.जयंत पाटील म्हणाले की शेतकरी कामगार पक्षाला पुरोगामी क्रांतिकारी व लढाऊ विचार व चळवळीचा वारसा आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत आप्पासाहेब नारायण नागु पाटील यांनी खोत, सावकार यांच्या जुलमी राजवटीला उलथवून लावण्याचे काम केले. रायगडात जगातील सर्वात मोठा शेतकरी संप पुकारून शेतकरी हिताचा "कसेल त्याची जमीन हा कुळकायदा" लागू करणाऱ्या महापुरुषांचे आपण वारसदार आहोत,देशात सर्वप्रथम
शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला हमी देण्याची भूमिका शेतकरी कामगार पक्षानेच घेतली. असे आ.पाटील यांनी ठासून सांगितले. केंद्र सरकारची नवी धोरणे शेतकरी, कामगार व सर्वसामान्य घटकांसाठी घातक आहेत. त्यामुळे या धोरणांना विरोध दर्शविण्यासाठी पुन्हा लढा देण्याची संघर्षाची वेळ आलीय, यासाठी सर्वानी सज्ज व्हा असे आवाहन आ.जयंत पाटील यांनी केले. कोरोनासारख्या जागतिक महामारीने जनजीवन ठप्प झाले होते. यामुळे अनेक महिने एकमेकांशी संपर्क होऊ शकला नाही.मात्र आता नव्याने प्रस्तापित असलेल्या केंद्र शासनाच्या जुलमी व अन्यायकारक धोरणांना कडाडून विरोध करण्याची वेळ आलीय.
प्रस्तावित कृषी विधेयकामुळे सिलिंग अॅक्ट रद्द होणार आहे.कंत्राटी पद्धतीने शेतीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. पण यामध्ये पिकाची गुणवत्ता संबंधित ठेकेदार ठरवणार असल्याने शेतकरी पुरता उध्वस्त होणार आहे, त्यांचे अस्तित्व संपणार आहे, असे आम.जयंत पाटील यांनी निदर्शनास आणले. सिलिंग ऍक्ट कायदा रद्द करून शेतकऱ्यांच्या जमिनी भांडवलंदार व बड्या उद्योजकांच्या घशात घालण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र व कुटील डाव हाणून पाडण्यासाठी आपल्याला एकजुटीने व्यापक स्वरूपाचा लढा देण्याची आज गरज निर्माण झालीय. देशातील कामगारांच्या हक्क व अधिकारांवर गदा आणली आहे, कामगारांना आठ ऐवजी 12 तास काम करायला लावून त्यांचे शोषण व पिळवणूक या कामगार कायद्याने होणार आहे. कोणत्याही कामगाराला तडकाफडकी काढून टाकण्याची तरतूद या कायद्यान्वये केल्याने कामगार देशोधडीला लागणार असल्याचे आ.जयंत पाटील म्हणाले. शेती , उद्योग, व्यापार, व घरगुती वापरासाठी एकच वीज दर करण्याचे केंद्राचे प्रस्तावित धोरण गोरगरीब, सर्वसामान्य जनतेच्या मुळावर उठणार आहे.
कोरोना संकटात सर्वसामान्य जनतेला जीवन मरणाशी संघर्ष करावा लागला, अशात भरमसाठ आलेल्या विजबिलानी जनतेचे अक्षरशः कंबरडे मोडले,28 लाख कोटी कर्ज घेण्याची राज्य सरकारची क्षमता आहे, त्यामुळे 4 ते 5 हजार कोटी रकमेतून सरकारने वीजबिल माफ करावे,अशी आग्रही मागणी शेकापने केली आहे. विजबिलात सूट द्या अन्यथा कुणीही वीजबिल भरणार नाही असा इशारा यावेळी जयंत पाटील यांनी दिला. शेकापची बांधिलकी जनतेशी आहे, त्यामुळे शेकाप जनहीतार्थ प्रश्नावर सतत लढत राहील, येत्या काळात शेकाप संघटनात्मक दृष्ट्या जमीन इतकी सुपीक करेल, की शेकाप कायम निर्णायक भूमिकेत दिसून येईल, असा विश्वास आ.पाटील यांनी व्यक्त केला. या सभेत आ.जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की पेण सुधागड मतदारसंघाला धैर्यशील पाटील व सुरेश खैरे यांच्यासारखे प्रभावी व कर्तृत्ववान नेतृत्व लाभले आहे.
त्यामुळे येथील पक्षसंघटना मजबूत व बळकट असल्याचे कौतुक जयंत पाटील यांनी केले. ते पुढे म्हणाले शेकाप दिलेला शब्द पाळणारा पक्ष. पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शेकाप करीत नाही. व कधी करणार नाही, कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना मजबुतीसाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. यावेळी मा आ धैर्यशीलदादा पाटील व सुरेशशेठ खैरे यांनीही केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगारविरोधी कायदे व सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या जाचक धोरणांचा कडाडून विरोध केला. कुळकायद्याने भूमिहीन, शेतमजूर, कष्टकरी वर्गाला मालक बनविले, ज्या महापुरुषांच्या त्याग व संघर्षातून आम्हाला जमिनीचे हक्क अधिकार मिळाले ते अधिकार संपवण्याचे कटकारस्थान आता सुरू आहे. केंद्र सरकारचे जाचक शेतकरी व कामगार विरोधी कायदे अंमलात आले तर येथील भूमालक देशोधडीला लागतील, व पुन्हा आपल्या डोक्यावर खोत सावकार येऊन राज्य करतील.
त्यामुळे आज याविरोधात आवाज उठविण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतकरी व कामगारांच्या हितासाठी शेकापने हाती घेतलेल्या लढ्यात सर्वानी सहभागी होऊन लढा यशस्वी करा. असे आवाहन पाटील यांनी केले. यावेळी माजी आ.धैर्यशील दादा पाटील, शेकाप नेते जि. प सदस्य सुरेशशेठ खैरे, जे.बी.गोळे, राजेंद्र राऊत, उत्तमराव देशमुख, पाली सरपंच अनंत वालेकर, अनंत वाघ, गणपत शेठ म्हात्रे, महादेव मोहिते, सरपंच राजश्री दाभाडे, विठ्ठल सिंदकर, पुरोगामी युवक संघटनेचे उपाध्यक्ष आरिफ मणियार, माजी सभापती भारतीताई शेळके, पंचायत समिती सदस्या सविताताई हंबीर, ऍड सुभाष पाटील, किसनराव उमठे, माजी सरपंच जनार्दन जोशी, गणेश बालके, संतोष भिलारे, रामभाऊ आंग्रे, धर्मेंद्र आंदेकर, रुपेश देशमुख , दिनेश ठोंबरे, मिलिंद बहाडकर, प्रीतम लाड, अमित घाटवळ, सुनिल कुंभार, संदीप घाग, राजेंद्र राऊत, सुधीर साखरले, संजोग शेठ, चंद्रगुप्त भालेराव,
योगेश शहा, नथुराम बेलोसे, हेमंत सिलीमकर, विनायक जाधव,अशोक शहा, असिफ बेनसेकर, इब्राहिम पानसरे, संजय हुले, संजय ठकोरे, सुधीर सावंत, श्रीयोग पाशीलकर, समृद्धी यादव, उषा शहा, अपर्णा कुंभार, कांचन माळी, अशोक शहा, अमोल कांबळे, मुस्तफा शेख, बशीर शाह, सलीम शेख, मोईन पानसरे, आदींसह शेकाप पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरिफ मणियार यांनी केले, तर आभार सुधीर साखरले यांनी मानले.