Home > News Update > "मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही"; किर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या विधानाने खळबळ

"मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही"; किर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या विधानाने खळबळ

मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही; किर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या विधानाने खळबळ
X

नाशिक : किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कोरोना लसीबद्दल एक विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. "मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही" असं विधान इंदुरीकर महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील एका कार्यक्रमात केले. घोटी कृषी उत्पन बाजार समितीत शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५००हुन अधिक लोकांची उपस्थिती होती, सोबतच महाविकास आघाडीचे स्थानिक नेते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

"ज्याची त्याची प्रतिकार शक्ती वेगळी आहे हे कळायला नको का. प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता देखील वेगळी आहे. मी सगळीकडे फिरतो. मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतचं नाही तर घेऊन करायचे काय?" असं विधान त्यांनी केलं आहे. सोबतच कोरोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. १४ वर्षे राम वनवासाला गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इथे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकवून पाहिला नाही. असं इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे.

कोरोना महामारीत अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर यांनी एक लाखांची मदत दिली होती. सोबतच लॉकडाऊन काळात संगमनेर तालुक्यातील कुटुंबाची होणारी संभाव्य उपासमार टाळण्यासाठी महाराजांनी ओझर, रहिमपूर, कोकणगाव, वडगापान येथील काही गरीब कुटुंबाना धान्याचे वाटप केले होते.

दरम्यान, याआधी देखील किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. इंदुरीकर महराज यांनी महिलाबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा लसीकरणावरून केलेल्या विधानामुळे चर्चेला उधाण आले आहे.

Updated : 3 Nov 2021 10:39 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top