स्वतःच्या डेथ इन्शुरन्ससाठी बनाव करत मनोरुग्णाला सर्पदंश देऊन केले ठार; पाचजण ताब्यात
X
अहमदनगर : एखाद्या थरारक सिनेमाच्या कथानकाला लाजवेल असे गुन्हेगारी कृत्य अहमदनगर जिल्ह्यातील राजूर पोलिसांनी समोर आणले आहे, त्यासाठी अमेरिकेतील इन्शुरन्स कंपनीची मदत देखील घेण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात राहणारा प्रभाकर भिमाजी वाघचौरे हा व्यक्ती गेली वीस वर्षे अमेरिकेत वास्तव्यास होता. अमेरिकेत असताना त्याने पाच मिलियन डॉलर्स भारतीय रुपयात 38 कोटी रुपयांची डेथ इन्शुरन्स पॉलिसी काढली होती.
मागील वर्षी प्रभाकर वाकचौरे हा अमेरिकेतून पुन्हा भारतात आपल्या गावी आला. त्यावेळी त्याच्या डोक्यात एक कल्पना सुचली. ती म्हणजे स्वतःचा मृत्यू अपघाती मृत्यू दाखवून डेथ इन्शुरन्स पॉलिसीचे पाच मिलियन डॉलर्स कमवण्याची. त्याने आपल्या इतर चार साथीदारांचा या कटात समावेश केला. एकाने सर्पमित्राकडून खोटे कारण सांगून एक विषारी साप बरणीत आणला. इतर दोघांनी एक वेडसर मनोरुग्ण शोधून आणला. चौथ्याने राजूर याठिकाणी एक रूम भाड्याने घेऊन ठेवली. आणि ठरलेल्याप्रमाणे मनोरुग्णाला एक दिवस भाड्याच्या रूमवर ठेवून दुसऱ्या दिवशी पहाटे चारच्या सुमारास या आरोपींची त्या मनोरुग्णाला जंगलात नेले, तेथे त्याच्या पायाला सर्पदंश दिला. सर्प दंशामुळे मनोरुग्णाचा तासाभरात मृत्यू झाला. या आरोपींनी 108 नंबरवर फोन करून पहाटे फिरायला गेलो असता सर्पदंश झाल्याचे सांगून अम्ब्युलस बोलावली. मात्र, एम्ब्युलन्स येण्यापूर्वी मृत्यू झाला असल्याने 108 नंबरच्या अम्ब्युलस चालकाने मृतदेह नेण्यास नकार दिला. प्रभाकर वाकचौरे वगळता इतर चार आरोपींनी बनाव करून सर्पदंशाने हत्या केलेल्या व्यक्तीला प्रभाकर वाकचौरे भासवून राजूर ग्रामीण रुग्णालयात नेऊन पोस्टमार्टेम करून घेतले. रुग्णालय व पोलिसांकडे मृत व्यक्ती वाकचौरे असल्याची नोंद करून घेतली. हा संपूर्ण प्रकार 19 एप्रिल रोजी घडला. आरोपीतील एकजण पंच झाला तर एकाने तो प्रभाकर वाकचौरे असल्याचे पोलिसांना सांगितले. यानंतर मृत व्यक्तीवर राजूरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
हा सर्व कट जानेवारी 21 ते एप्रिल 21 मध्ये आखण्यात आला होता. प्रभाकर वाकचौरे याने पाच मिलियन डॉलर्सच्या डेथ इन्शुरन्स साठीचा केलेला हा बनाव व्यवस्थित पार पडला होता. मात्र, अमेरिकेतील ज्या ऑल इंडिया ऑल स्टेट इन्शुरन्स अमेरिका कंपनीकडे क्लेम होता, त्या कंपनीकडे प्रभाकर वाकचौरे याने अमेरिकेत असताना पत्नी जिवंत असताना तिचा मृत्यू झाल्याचे कळवून इन्शुरन्स क्लेम लाटण्याचा प्रयत्न केला होता. तो फसला होता. ही पार्श्वभूमीवर असल्याने कंपनीला त्याच्या मृत्यूची माहिती मिळाल्याने त्यांना संशय आला आणि त्यांनी कंपनी इन्व्हेस्टीगेटर मार्फत अहमदनगर पोलिसांना तपास करण्याची विनंती केली. त्यानुसार संगमनेर उपअधीक्षक आणि राजूर पोलिसांनी गुप्त खबऱ्यामार्फत तपास सुरू केला.
दरम्यान वाकचौरे जिवंत असून तो अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथे राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान वाकचौरेला वडोदरा, गुजरात येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवताच त्याने केलेला बनाव आणि त्यातील इतर चार साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेत, या सर्वांवर अपहरण, हत्या, फसवणूक आदी कलमांखाली राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ज्या मनोरुग्णाचा यात बळी गेला तो अकोले तालुक्यातीलच असून त्याचे नाव नवनाथ यशवंत आनप असे आहे.
या हत्येप्रकरणी प्रभाकर भिमाजी वाघचौरे ,संदिप तळेकर, हर्षद रघुनाथ लहामगे, हरिष रामनाथ कुलाळ प्रशांत रामहरी चौधरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.