Home > News Update > केतकी चितळेला न्यायालयीन कोठडी

केतकी चितळेला न्यायालयीन कोठडी

केतकी चितळेला न्यायालयीन कोठडी
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत फेसबुक पोस्ट लिहल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या केतकी चितळेची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला आज ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी केतकी चितळे हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर गोरेगाव पोलिसांकडून तिचा ताबा घेतला जाणार आहे. दरम्यान, केतकी चितळे हिच्याकडून जामिनासाठी न्यायालयात अर्ज देखील करण्यात आला आहे.

ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट १ कडून केतकी चितळे हिची पोलीस कोठडीत चौकशी झाली आहे. पोलिसांनी केतकीच्या घरी जाऊन तिचा लॅपटॉप आणि अन्य काही गोष्टीही ताब्यात घेतल्या होत्या. केतकी चितळेचा मोबाईलही पोलिसांच्या ताब्यात आहे. तिच्या लॅपटॉप आणि मोबाईलची सायबर सेलकडून तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल ठाणे गुन्हे शाखेला सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, केतकी चितळे हिच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर इतक्या खालच्या भाषेत टीका करणे खपवून घेतले जाता कामा नये. केतकी चितळे हिच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी केतकी चितळे हिच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता संबंधित ठिकाणच्या पोलिसांकडून केतकी चितळे हिचा ताबा मागितला जाऊ शकतो. त्यामुळे केतकी चितळे आणखी काही काळ तरी न्यायलयीन कोठडीत राहण्याची शक्यता आहे. मात्र, येत्या काही दिवसांत पोलिसांकडून केतकी चितळे हिच्याविरोधात काही नवीन पुरावे सादर केले जाऊ शकतात का, हे पाहावे लागेल. तसे पुरावे सापडल्यास केतकी चितळे हिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Updated : 18 May 2022 12:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top