के सी आर दिल्लीत, उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर केजरीवाल आणि राकेश टिकैत यांची घेणार भेट
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे 2024 च्या लोकसभा निवडणूकांसाठी विरोधकांची मोट बांधत आहे. त्यासाठी केसीआर हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्या या तीन दिवसात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेणार आहेत.
X
काही दिवसांपूर्वी केसीआर यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. जानेवारीमध्ये बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी हैदराबाद येथे केसीआर यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी 2024 ला भाजपविरोधात कशा पद्धतीने मोर्चेबांधणी करता येईल, याची चाचपणी करत देशभरातील भाजपविरोधकांची मोट बांधण्याचे काम करत आहेत.
जानेवारीमध्येच केसीआर यांनी सीपीएम आणि सीपीआयच्या मोठा नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्या होत्या. या अगोदर केसीआर यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची देखील भेट घेतली होती. तर दिल्लीत येण्यापूर्वी केसीआर यांनी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली होती. 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल 10 मार्च ला लागणार आहेत. या निकालानंतर आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टिकोनातून मोर्चेबांधणी केली जाणार आहे.
उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपचा पराभव झाला, तर विरोधी पक्षांची एकजूट होऊन भाजपविरोधात मोर्चेबांधणी होण्याची शक्यता आहे. तर केसीआर व्यतिरिक्त, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील यूपीएपासून दूर राहून विरोधी पक्षांची आघाडी तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि गेल्या अनेक महिन्यांत त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. उत्तर प्रदेशातील सपा प्रमुख अखिलेश यादव यांना ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा दिला आहे.
केसीआर यांना तेलंगणात भाजपकडून सतत आव्हान दिले जात आहे आणि अशा परिस्थितीत ते तेलंगणातून भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.
या अगोदरही केला होता प्रयत्न
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही केसीआर यांनी यूपीएपासून फारकत घेऊन विरोधी पक्षांची आघाडी बनवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतर त्यांना या प्रयोगात यश आले नव्हते. मात्र, यावेळी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते का, हे पाहाणं महत्त्वाचे आहे.