पोलिसांपुढे हजर व्हा: वादग्रस्त विधाने करू नका: हायकोर्टाचा कंगना भगिनींना आदेश
X
वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंडोली यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करावा, यासाठी कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कंगनाची मागणी फेटाळून लावली. मात्र, याचवेळी कंगनावरील देशद्रोहाच्या गुन्ह्याबाबतही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी कंगना आणि रंगोली यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यात देशद्रोहाचा गुन्हाही त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. कंगना आणि रंगोली यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यावेळी त्या दोघींनी भावाचे लग्नाचे कारण पुढे करीत चौकशीला हजर राहण्यास मुदतवाढ मागितली होती. त्यानंतर पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. या समन्सला त्यांनी उत्तरच दिले नव्हते.
मुंबई पोलिसांनी त्या दोघींना चौकशीसाठी तिसऱ्यांदा समन्स बजावले होते. त्यांना २३ व २४ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. आता कंगणाच्या वकिलांनी येत्या 8 जानेवारी रोजी कंगना आणि रंगोली चौकशीसाठी हजर राहतील असे सांगितले . यादरम्यान या प्रकरणाबाबत कुठेही जाहीर वक्तव्य करू नये अशी तंबी न्यायालयाने दिली आहे.
कंगना आणि रंगोलीने या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने हा गुन्हा रद्द करण्यास नकार दिला. कंगना आणि रंगोलीने तीन वेळा समन्स बजावूनही चौकशीसाठी हजेरी लावली नाही याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.