Home > News Update > सतर्क पत्रकार विलास बडे यांनी वाचवला वृध्द महिलेचा जीव

सतर्क पत्रकार विलास बडे यांनी वाचवला वृध्द महिलेचा जीव

लोकलमधील गर्दीमुळे अनेक जणांचे अपघात होतात. यामध्ये काही जणांना रेल्वे पोलिसांकडून तर कधी सतर्क प्रवाशांकडून वाचवलं जातं. त्याच प्रकारे आपल्या सतर्कतेमुळे पत्रकार विलास बडे यांनी वृध्द महिलेचा जीव वाचला.

सतर्क पत्रकार विलास बडे यांनी वाचवला वृध्द महिलेचा जीव
X

मुंबईतील (Mumbai Local) गर्दीमुळे लोकलमध्ये अनेक अपघात होतात. त्यामध्ये काहींना वाचवणे शक्य होते तर अनेक जणांना वाचवायला कुणीच पुढे न धावल्याने काही प्रवासी जीवाला मुकतात. मात्र शनिवारी मुंबईत सतर्क पत्रकार विलास बडे (Sr. Journalist Vilas Bade) यांच्यामुळे एका वृध्द महिलेचा जीव वाचला. याबाबत विलास बडे यांनी ट्वीट करून अनुभव कथन केला आहे.

यावेळी विलास बडे यांनी म्हटलं आहे की,ऑफिसला लवकर पोहोचायचं होतं. घाईघाईत ११ वा. खारघर (Kharghar) स्टेशनला पोहोचलो. स्टेशनवर ठाण्याला जाणारी लोकल (Thane Local Train) आली. थोडा हिरमोड झाला, कारण मला CST पकडायची होती. प्लॅटफॉर्मवरून ठाणे लोकल निघाली, तेवढ्यात लोकांच्या ओरडण्याचा आवाज आला. समोर एक ६५-७० वर्षांची आज्जी लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकून घासत जात होती. तिचा एक पाय लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकला होता आणि एक पाय लोकलमध्ये होता. लोकल वेगाने पुढे जात होती. क्षणभर काहीच सुचलं नाही, धावत जावून पूर्ण ताकदीने आज्जीला खेचलं.

सुदैवाने आज्जीने हॅंडलचा हात सोडला त्यानंतर दोघेही प्लॅटफॉर्मवर कोसळलो. जेमतेम पाच सेकंदात हे सगळं घडलं. घडलेल्या प्रसंगाने आज्जी प्रचंड भेदरली होती. तिला घट्ट मिठी मारली. आम्ही सगळ्यांनी तिला धीर दिला. तोपर्यंत मोठी गर्दी जमली. आज्जी स्थिर स्थावर झाल्यावर पुढच्या प्रवासाला निघालो काही सेकंदात एक जीव वाचवल्याचं समाधान घेवून.

अशा प्रकारे न्यूज 18 लोकमतचे (News18 Lokmat) सिनियर न्यूज अँकर (News Anchor) विलास बडे यांनी घडलेला प्रसंग कथन केला आहे. विलास बडे यांच्या सतर्कतेमुळे वृध्देचा जीव वाचला. त्यामुळे काही सेकंदात महिलेचा जीव वाचवण्याचं समाधान मिळाल्याचं विलास बडे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Updated : 22 Jan 2023 7:39 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top