सावज टप्प्यात: सांगलीनंतर जळगाव महापालिकेत करेक्ट कार्यक्रम होणार?
भाजपचे संकटमोचक गिरिश महाजनच संकटात, सांगली नंतर जळगाव महापालिकेत सावज टप्प्यात येणार…, भाजपचे 25 नगरसेवक ऑउट ऑफ रिच, काय घडतंय पडद्यामागे...
X
जळगाव महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीला तीन दिवस शिल्लक असतानाच महापालिकेत राजकीय भूकंप झाला आहे. सत्ताधारी भाजपचे 57 पैकी तब्बल 25 हून अधिक नगरसेवक शिवसेना नेत्यांबरोबर सहलीला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे भाजपकडून व्हीप बजाविण्याआधीच हे नगरसेवक शिवसेनेच्या गोटात गेले आहेत. शिवसेनेकडून सर्व नगरसेवकांना व्हीप बजाविण्यात आला असून, महापौरपदासाठी जयश्री महाजन यांचे नाव देखील निश्चित केले आहे.
भाजपमध्येच अंतर्गत रस्सीखेच -
जळगाव महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहूमत आहे. तर महापौर व उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 17 मार्च रोजी संपणार आहे. 18 मार्च रोजी नवीन महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी सत्ताधारी भाजपमध्येच चांगलीच रस्सीखेच निर्माण झाली होती. विद्यमान महापौर भारती सोनवणे यांनाच कायम ठेवावे असा एक गट तर दुसरा गट ठरल्यानुसार जातीय समिकरणानुसार मराठा समाजाच्या उमेदवाराला संधी देण्यात यावी यावर आग्रही आहे.
भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजनही याच समीकरणावर ठाम होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या अंतर्गत रस्सीखेचामुळे अनेक नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आले. हा वाद चालू असतांनाच माजी मंत्री गिरीश महाजन महापौरपदाबाबत भाजप नगरसेवकांची बैठक घेणार होते. मात्र, त्याआधीच नाराज भाजपचे नगरसेवक थेट शिवसेनेच्या नेत्यांना जाऊन मिळाल्याने महापालिकेत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपचे 25 नगरसेवक फुटल्याने शिवसेनेकडून महापालिकेत सेनेचा भगवा फडकण्याची शक्यता आहे.
मातोश्रीवर खलबतं, पालकमंत्र्यांच्या फार्महाऊसवर जुळली गणितं..
महापौरपदाच्या निवडीसाठी केवळ तीन दिवस शिल्लक असतानाच, शिवसेनेकडून सत्ताधारी भाजपला मोठा धक्का दिला आहे. 14 मार्चपासून भाजपचे 25 नगरसेवक नॉट रिचेबल होते. ही सर्व सूत्रं सुरुवातीला थेट मुंबईच्या सेना नेत्यांकडून हलली. त्यानंतर काल (14 मार्च) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सर्व नगरसेवक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील फार्म हाऊसवर एकत्र आली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केली. पुढील विकास कामे कशी करायची नियोजन काय असेल? याची चर्चा करण्यात आली. या ठिकाणाहूनच सेनेची सर्व सूत्र हलली तसेच सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सर्व नगरसेवक मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
भाजपचे नगरसेवकही अज्ञातस्थळी -
भाजप मधील नाराज बंडखोर नगरसेवक शिवसेनेच्या गोटात गेल्याने भाजप मध्ये खळबळ उडाली. आणखीन नगरसेवक फुटू नये म्हणून भाजपचे 28 नगरसेवक ही अज्ञातस्थळी सहलीला पाठवण्यात आले आहे. काही महिला सदस्य फुटणार नसल्याने त्या घरीच आहेत. फुटीची लागण झाल्यानंतर भाजप नगरसेवकांना आज पक्षाचा व्हीप जारी केला आहे. तर शिवसेनेनं अगोदरच पक्षाचा व्हीप जारी केला आहे.
भाजप नगरसेवकांची शिवसेनेत प्रवेशाची चर्चा -
नाराज भाजपचे 25 बंडखोर नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची त्यांच्याच समर्थकांकडून केल्याची चर्चा सुरू आहे. आघाडीचे सरकार असल्याने पक्षांतर बंदी कायदा बाबत अडीच वर्षे वेळ मारून नेली जाईल. अशीही खात्री नेत्यांकडून दिल्याचं बोललं जातं आहे. ह्या अटींमुळे काही नगरसेवक निश्चिंत आहेत. असं बोललं जातंय. महाविकास आघाडीच्या एका बड्या नेत्यानेच ह्या नगरसेवकांना पूर्ण मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. अडीच वर्षांपूर्वी सांगली आणि जळगाव भाजपच्या एकहाती सत्ता-
अडीच वर्षापूर्वी भाजपचे देवेंद्र फडणवीस सरकार असतांना पहिल्यांदाच सांगली आणि जळगाव महापालिकेत प्रचाराची पूर्ण ताकद वापरून भाजपने या दोनही महापलिकांवर पूर्णपणे स्पष्ट बहुमत मिळवत एकहाती सत्ता मिळवली. मात्र, भाजपची सत्ता गेली महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सत्ता समीकरण बदललं. काही दिवसांपूर्वीच सांगली महानगर पालिकेत भाजपचे बहुमत असतानाही काँग्रेस राष्ट्रवादीने भाजपचे नगरसेवक फोडून सत्ता मिळवली. आता तोच कित्ता जळगाव महानगर पालिकेत शिवसेना सत्ता मिळवण्याच्या तयारीत आहेत.
शिवसेनेचे फक्त 15 नगरसेवक असतांना शिवसेनेने एम आय एम चे नगरसेवक यांना बरोबर घेऊन भाजपचा एक मोठा गटच शिवसेनेला जाऊन मिळाला आहे. शिवसेनेला एम आय एम च्या तीन नगरसेवकांचा पाठिंबा- जळगाव महापालिकेत एम आय एम पक्षाचे तीन नगरसेवक आहेत. शिवसेनेला सत्तेसाठी एम आय एम च्या नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचं बोललं जातं आहे. तिनही नगरसेवकांनी पालकमंत्र्यांच्या भेट घेतल्याचीही चर्चा आहे. सत्ता मिळवण्यासाठी एम आय एम च्या नगरसेवकांनी मदत मिळाली तर घेतली जाईल. असं काही स्थानिक सेना नेत्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे जळगाव महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस चा एकही सदस्य निवडून आला नाही. त्यांची संख्या शून्य आहे.
जळगाव महापालिका पक्षीय बलाबल-
एकूण सदस्य -75
भाजप - 57
शिवसेना- 15
एम आय एम - 03
नेत्यांची काय आहे प्रतिक्रिया-
गिरीश महाजन - भाजपने व्हीप बजावला आहे. व्हीप चा भंग केल्यास संबंधीत नगरसेवकांवर कार्यवाही होईल. सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून घोडेबाजार सुरू केला आहे.
गुलाबराव पाटील- पालकमंत्री - भाजपचे काही नाराज नगरसेवक भेटले. त्यांच्या कामाच्या बाबतीत चर्चा झाली. त्यांच्या काही समस्या मागण्या पालकमंत्री म्हणून आपणाकडे मांडल्या. भेटलेले नगरसेवक कुठे आहेत? ते आपल्याला माहीत नसल्याचं पाटील यांनी सांगितलं.
नितीन लड्डा - नेता - शिवसेना महापालिका महापौरपदासाठी शिवसेना अर्ज भरणार आहे, 18 तारखेला शिवसेनेचाच महापौर होईल. आमच्या कडे बहुमत आहे वेळ आल्यावर सर्व कळेलच .
एकनाथ खडसे: राष्ट्रवादी कॉंग्रेस गेले दोन अडीच वर्षे झाले. महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे. मात्र, जळगाव शहराचं चित्र जर पाहिलं. तर ते विकासाच्या नव्हे तर अविकासाच्या दृष्टीने पावलं टाकणारं आहे. शहरामध्ये काम होत नाही. नगरसेवकांचं प्रशासन ऐकच नाही. अशा अनेक तक्रारी माझ्याकडं ही आलेल्या आहेत. अनेकांकडे गेलेल्या आहेत. आणि याचा परिणाम असा झाला. आता त्या नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे भाजप अधिक शिवसेना आणि एमआयएम असे मिळून 45 – 46 लोकांचा गट तयार झालेला आहे. या महापालिकेत सत्ताबदल करावं असा त्यांच्या लेव्हलला निर्णय झालेला आहे.
या सर्वांनी मिळून माझी भेट घेतली. त्यांनी सर्व परिस्थिती मला सांगितली. त्यानंतर मी त्यांना सांगितलं सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे. तर करायला हरकत नाही. मी आता भारतीय जनता पार्टीत नाही. यात स्पष्ट आहे. महापौर कोण होणार शिवसेना ठरवेल आणि उपमहापौर जे भाजपचे फुटीर नगरसेवक आहेत. ते मी ठरवेल. असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आहे.