जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून शुद्धी केली ती बरोबर आहे असं जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. ते चोपडा येथे बोलत होते.
X
जनतेमध्ये जनाधिकारच राहिलेला नाही, जनाधिकार संपलेला आहे आता ही जन आशीर्वाद यात्रा काढून लोकं आपल्याकडे कसे वळतील असा हा केविलवाणा प्रकार भाजपकडून सुरू आहे असे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. ते चोपडा येथे आपल्या बहिणीकडे रक्षाबंधनासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला
दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले की, शिवसेनेमुळे नारायण राणे मोठे झाले हे त्यांनी मान्य केले आहे. त्यांनी स्वतःच्या मनाला विचारावे की बाळासाहेबांना सर्वात जास्त त्रास कुणी दिला? ज्या बाळासाहेबांनी त्यांना एवढी उंची दिली त्या बाळासाहेबांना शेवटच्या घटकामध्ये या लोकांनी त्रास दिला. सहाजिकच आहे कार्यकर्त्यांची भावना आहे, गोमूत्र शिंपडले ते बरोबर आहे . गद्दारांचे हात बाळासाहेबांच्या समाधीला लागता कामा नये.
सोबतच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले आहे की, राणे यांचे हे पोकळ अंदाज आहे.
बऱ्याच लोकांनी शिवसेनेला आव्हान दिलं , पण मुंबई आणि शिवसेना हे अतूट नात आहे, जेव्हा ही संकट येतं तेव्हा मुंबईकरांना शिवसेना आठवते. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केला तरी शिवसेनेचा भगवा झेंडा तीस वर्षांपासून बाळासाहेबांच्या आशीर्वादाने फडकतो आहे तो निश्चितपणे येत्या काळात महापालिकेवर दणदणीत फडकेल असा विश्वास आम्हाला आहे असं पाटील यावेळी बोलताना म्हणाले.