ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलकडून जागर आंदोलन
आरक्षणावर गदा आणण्याचे प्रयत्न होत असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी आरक्षण जागर आंदोलन करण्यात आले.
X
ऑगस्ट 1990 रोजी तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली होती. तेव्हापासून या देशातील ओबीसी जात प्रवर्गाला नोकरी आणि राजकीय क्षेत्रात आरक्षण लागू झाले. सध्या या आरक्षणावर गदा आणण्याचे प्रयत्न होत असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी आरक्षण जागर आंदोलन करण्यात आले.
ओबीसी जात प्रवर्गातील जातींना आरक्षण देण्यासाठी जोगेंद्रनाथ मंडल यांनी सादर केलेला अहवाल 7 ऑगस्ट 1990 रोजी तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी लागू केला होता. तेव्हापासून ओबीसींना आरक्षणाचा लाभ मिळण्यास सुरूवात झाली होती. याच दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीने हे जागर आंदोलन करण्यात आले.
यावेळी गोंधळ घालण्यात आला. तसेच ओबीसी कार्यकर्त्यांनी मशाल पेटवून ओबीसी समाजामध्ये क्रांतीचा अंगार पेटवण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी राज राजापूरकर यांनी, ओबीसींचे आरक्षण रद्द करण्याचा कट भाजप सरकारने आखला आहे. पण, त्यांचे हे मनसुबे आम्ही उधळून लावण्यास सज्ज आहोत. मंडल आयोगाच्या विरोधात ज्या लोकांनी आंदोलन केले होते. तेच आता केंद्रात सत्तेवर आहेत. या लोकांना आरक्षण संपवायचे आहे. पण, आम्ही बलिदान देऊ पण आरक्षण टिकवू, असे म्हटले आहे.
तर, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष गजानन चौधरी यांनी, केंद्र सरकारने आकडेवारी सादर न केल्याने ओबीसी आरक्षणावर गदा आली आहे. आज आम्ही ओबीसी समाजाला जागे करण्यासाठी मशाल पेटवली आहे. यापुढील आमचे आंदोलन अधिक उग्र असेल, असा इशारा दिला. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्याविरोधात जोरदार घोषणबाजी केली.