Home > News Update > इसाळवाडी धोक्यात २०१५ मध्येच दिलं होतं पत्र. सरकारच्या हलगर्जीपणाचे बळी

इसाळवाडी धोक्यात २०१५ मध्येच दिलं होतं पत्र. सरकारच्या हलगर्जीपणाचे बळी

आमचा जीव धोक्यात आहे. इसाळवाडी ग्रामस्थांनी अगोदरच प्रशासनाला कळवले होते. सरकारच्या हलगर्जीपणामुळे येथील लोकांचा बळी गेला आहे का ?

इसाळवाडी धोक्यात  २०१५ मध्येच दिलं होतं पत्र. सरकारच्या हलगर्जीपणाचे बळी
X

इसाळवाडी या आपल्या गावावर दरड कोसळू शकते.यातून आपल्या गावाला धोका निर्माण होऊ शकतो याची भीती अगोदरच येथील नागरिकांना वाटत होती. त्यांनी ही भीती निवेदनाद्वारे प्रशासनाला देखील कळवली होती. सात वर्षापूर्वीच दिलेल्या निवेदनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच येथील नागरिकांचा जीव गेल्याचा आरोप आदिवासी संघर्ष समितीने केला आहे.

२०१५ या वर्षीच यासंबंधी इसाळवाडी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. यामध्ये आपल्या गावात भीमाशंकरच्या पायथ्याशी असलेल्या माळीण या गावासारखीच दुर्घटना होण्याचा धोका त्यांनी व्यक्त केला होता. पुनर्वसन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागेचा उतारा देखील त्यांनी दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या पण या कागदी घोड्यांमध्ये या गावाचे पुनर्वसन करण्यात आले नाही. नागरीकांनी दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे येथील नागरिकांना आपल्या जीवास मुखावे लागले.

यासंदर्भात आदिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष मलू निर्गुडे यांनी इरशाळवाडी येथे घडलेल्या घटनेला वनविभाग व जिल्हाप्रशासन कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे.

इसाळवाडी येथील घटना प्रशासनाच्या दिरंगाईमुळे घडलेली असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आदिवासी अधिकार संघर्ष समितीचे सल्लागार बि.पी. लांडगे यांनी केली आहे.

दुर्घटनेनंतर इसाळवाडीकडे राजकीय नेत्यांची वर्दळ सुरु आहे. राजकीय पर्यटन सुरु आहे. पण येथील नागरिकांनी सात वर्षापूर्वी केलेल्या निवेदनाची दखल सरकारकडून घेतली गेली असती तर आज या नागरिकांचे मृतदेह शोधण्याची वेळ आली नसती. आदिवासी नागरिकांच्या या निवेदनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर, मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी आदिवासी कार्यकर्त्यांनी केली आहे.

इसाळवाडी येथील नागरिकांनी दिलेल्या पत्रात काय म्हटले होते जाणून घेण्यासाठी हे पत्र जसेच्या तसे…





दिनांक २५/०६/२०१५

प्रति,

मा. जिल्हाधिकारी

रायगड अलिबाग यांस

सविनय सादर

अर्जदार- इसाळवाडी ग्रामस्थ पो. चौक, ता. खालापूर, जि. रायगड

विषय - नवीन गावठाण मिळणेबाबत

महोदय,

वरील विषयास कारणे अर्ज करतो की, सदरची आदिवासी वाडी ग्रुप ग्रामपंचायत चौक या ग्रामपंचायतीत प्रस्थापित आहे. महोदय, ही आदिवासी वाडी १० किलोमीटर स्तरावर आहे. सदरच्या वाडीची उंची बेहिशोबी आहे. तसेच ही वाडी डोंगराच्या कडे-कपारीत असल्या कारणे सदर वाडीस प्रचंड धोका आहे. तसेच भीमाशंकर जवळ असलेल्या मालीन गावासारखी दुर्घटना घडू शकते.

सदरचे गावातील भविष्याचे दृष्टीने मुलांचे शिक्षण, राहणीमान, जीवनावश्यक बाबी अशा विविध प्रकारचे समस्या भेडसावत आहेत. याचा विचार करता, आम्हा ग्रामस्थांना डोंगराळ मुख्य वस्तीलगत येण्याची आवश्यकता आहे. याचेवर विचार विनिमय त्वरित करण्यात यावा.

सदर जागा सर्व्हे नंबर २७ मध्ये उपलब्ध आहे. या जागेचा उतारा जोडत आहोत.

आपले विश्वासू

इसाळवाडी ग्रामस्थ





Updated : 25 July 2023 1:49 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top