आता वादळाचेही राजकारण : मोदी गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊत
तौते चक्रीवादळाने गुजरात महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोरदार तडाखा दिला. गुजरातमध्ये अनेक गावांना फटका बसला आहे. चक्रीवादळ गुजरात आणि दीव किनारपट्टीला जाऊन धडकलं होतं. त्यामुळे प्रचंड नुकसान झालं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या पाहणी दौऱ्यावरून खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.
X
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात पाहणी दौऱ्यावरुन संजय राऊत यांनी टीका केली. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आहेत. ते कोणत्याही संकटाचा सामना करण्यास समर्थ आहेत, याची खात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पटली असेल आणि ज्याठिकाणी जास्त नुकसान झालं, पण कमजोर सरकार आहे. अशा ठिकाणी जाऊन लोकांना धीर देण्याचा प्रयत्न करत असतील, त्याकडे वेगळ्या नजरेनं पाहण्याची गरज आहे असं मला वाटतं नाही. त्यामुळेच मोदी महाराष्ट्रात न येता फक्त गुजरातच्या दौऱ्यावरच गेले असावेत," असा चिमटा राऊत यांनी मोदींना काढला.
"तौते चक्रीवादळामुळे गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रात नुकसान झाले आहे. अशा संकटाच्यावेळी कोणावरही टीका करणे योग्य नाही. मात्र, गुजरात हे पंतप्रधान मोदी यांचे स्वत:चे राज्य आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे फक्त गुजरातचा दौरा करत असावेत," असंही राऊत म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडेनऊ वाजता दिल्लीतून निघून भावनगर येथे पोहोचले त्यानंतर त्यांनी पुन्हा देऊ जाफराबाद आणि महुवा या भागातील हवाई दौरा केला शिवाय अहमदाबादमध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठक देखील केली. गुजरात मध्ये वादळात तेरा लोक मृत्युमुखी पडले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्याशी टेलीफोनवरून चर्चा केली असून आवश्यक मदतीबाबत आश्वासन दिल्याचे समजते. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीमध्ये चक्रीवादळाच्या नुकसानीचा आढावा घेतला जाणार आहे.