नदीकाठी धोकादायक ठिकाणी 'फ्लड सेन्सर्स', 'सीसीटीव्ही कॅमेरे' बसवा
पवना आणि इंद्रायणी नदीकाठच्या परिसरात पावसाळ्यातील अतिवृष्टीचा धोका लक्षात घेवून ‘फ्लड सेन्सर्स’,‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवण्यात यावेत अशी मागणी होत आहे.‘फ्लड सेन्सर्स’,‘सीसीटीव्ही कॅमेरे’मुळे संकट काळात महापालिका आपत्ती निवारण कक्षाला मदत होईल यासाठी ही मागणी करण्यात आली आहे.
X
पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नदीकाठच्या परिसरात पावसाळ्यातील अतिवृष्टीचा धोका लक्षात घेवून 'फ्लड सेन्सर्स' बसवण्यात यावेत. तसेच, मोठ्या प्रमणात पाणी साचणाऱ्या ठिकाणी 'सीसीटीव्ही कॅमेरे'तैनात करावेत.अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे. 'फ्लड सेन्सर्स', 'सीसीटीव्ही कॅमेरे'बसवल्यास संकट काळात महापालिका आपत्ती निवारण कक्षाला मदत होईल असं दीपक मोढवे यांनी म्हटले आहे.
महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, पवना धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यानंतर धरणातून विसर्ग केला जातो. त्यामुळे पवना नदीकाठच्या गावांमध्ये पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होत असते. शहरातील रावेत, किवळे, चिंचवड, पिंपरी, पिंपळे निलखसह नदीकाठच्या भागात पाणी घुसण्याचा धोका आहे. रात्री-अपरात्री पाणी वाढल्यास काय करावे? अशी भिती नागरिकांमध्ये असते. इंद्रायणी नदी काठी मोठी लोकवस्ती आहे. त्यामुळे भविष्यात येथे मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून या ठिकाणी 'फ्लड सेन्सर्स', 'सीसीटीव्ही कॅमेरे'बसवणे गरजेचे आहे असं मोढवे यांनी म्हटले आहे.
शहरातील सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा
पावसाळ्यात पिंपरी चिंचवड शहरात अनेक सखल भागांत पाणी साचते. पुणे-मुंबई महार्गावरील पुनावळे व ताथवडेसह वाकडमधील सेवा रस्त्यांवर नेहमीच पाणी साचते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी पाणी साचल्यास नागरिकांची तारांबळ उडते. त्याठिकाणी वाहतूक वळवण्याची गरज असल्याचे मोढवे यांनी म्हटले आहे.