'लोका सांगे ब्रह्मज्ञान...'; इंदोरीकरांना नाही का कोरोनाचा ज्ञान
X
औरंगाबाद: देशात आणि जगभरात अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे मास्क, सोशल डिस्टन्स आणि प्रशासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. मात्र, असे असताना काही व्हीआयपी लोकांना वेगळे नियम तर लागू नाही ना?, असा प्रश्न सामान्य व्यक्तींना पडत आहे. आणि असा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे मंगळवारी औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाला झालेली गर्दी.
वैजापूर शहरात एका खाजगी डॉक्टराने आपल्या रुग्णालयात विषबाधा आणि सर्पदंश विभाग चालू केले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्ताने शहराच्या लाडगाव रोडवरील पाण्याच्या टाकी जवळ निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते.
राज्यात अजूनही लॉकडाऊन सुरू असून जिल्हाधिकारी यांनी गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, या कार्यक्रमात सर्व नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली.
कीर्तन करताना खुद्द इंदोरीकरांनीच मास्क घातला नव्हता, त्यामुळे त्याचे आजूबाजूला गर्दी करणाऱ्या इतरांकडून काय अपेक्षा करणार. एवढंच नाही तर सोशल डिस्टनचे नियम सुद्धा धाब्यावर बसवण्यात आले होते. कीर्तन ऐकण्यासाठी महिला, पुरुष आणि तरुणांनी मोठी गर्दी केली होती.
तसेच कोरोनाच्या काळात सार्वजनिक कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी घेणे अपेक्षित होते. मात्र, या कार्यक्रमाला पोलीसांची कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे आता आयोजक आणि इंदोरीकर महाराज यांच्यावर लॉकडाऊन नियमांच उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार का? हा खरा प्रश्न आहे. अन्यथा हे नियम म्हणजे फक्त सामन्य लोकांसाठीच आहे असं म्हणायला हरकत नाही.