कोल्हापूरात उभारले देशातले पहिले संविधान केंद्र..
X
भारतीय लोकशाहीत संविधानाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारत एकसंध ठेवण्यातही या संविधानाचा मोठा वाटा आहे. मात्र, समाजातील काही घटकांचा अपवाद सोडल्यास संविधान म्हणजे काय? आपले हक्क मिळवण्यासाठी संविधानाची गरज काय? याची जाणीव नागरिक म्हणून दिसून येत नाही. म्हणूनच संविधानाच्या ओळखीसोबतच ते फक्त हक्क मिळवण्यासाठी नव्हे तर आपल्या रोजच्या जगण्यातही अत्यंत महत्त्वाचे आहे. याची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी या हेतूने कोल्हापूर जिल्ह्यात देशातील पहिले संविधान प्रशिक्षण केंद्र उभे राहिलं आहे.
लोकराजा राजर्षी शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र असे याचे नामांकरण करण्यात आले असून हे केंद्र उभे करण्यात हर्षल जाधव, रेश्मा खाडे, राजवैभव शोभा रामचंद्र अशा युवकांचा पुढाकार आहे. 3 जानेवारी म्हणजेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. 'या आधी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी संविधान संवाद शाळा घेत संविधान मूल्यांचा प्रचार प्रसार करत होतो. हा विचार अधिकाधिक पोहचावा. यासाठी संविधान संवादक तयार होणे गरजेचे आहे. त्यासाठी हे केंद्र काम करेल. भारुड, पोवाडा, फिल्म्स, पोस्टर्स प्रेझेंटेशन आदि माध्यमातून इथं शिक्षक,विद्यार्थी, युवकांना प्रशिक्षित केले जाईल.'
असे कार्यक्रमाची प्रस्तावना करताना संविधान प्रशिक्षण केंद्राच्या स्थापना समितीतील सदस्य राजवैभव शोभा रामचंद्र यांनी सांगितले. या कार्यक्रमात रेश्मा खाडे व प्रणिता वारे यांनी संकलित केलेल्या 'सावित्री वदते' आणि हर्षल जाधव व श्रीनिवास शिंदे यांनी संकलित केलेल्या 'जवाहर' या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. यावेळी उद्घाटक आमदार प्रकाश आबिटकर, प्रमुख वक्ते दिव्य मराठीचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, राधानगरीच्या सरपंच कविता शेट्टी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती, राज्य कार्यवाह सुनील स्वामी, राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्यवाह संजय रेंदाळकर, सुनील कांबळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.