भारत प्रत्युत्तर देण्यास सक्षम, राष्ट्रपतींचा चीनला इशारा
X
स्वातंत्र्य दिनाच्या (Indian Independence Day) पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोंविद (Ram Nath Kovind) यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात चीनला (China ) इशारा दिला आहे. “आमचा शांततेच्या धोरणावर विश्वास आहे पण शेजारी देशाने आक्रमण करत विस्तारवादाचे धाडस केले तर त्याला सडेतोड उत्तर देण्यास भारत सक्षम आहे, या शब्दात राष्ट्रपतींनी चीनला इशारा दिला आहे. चीनचे नाव न घेता राष्ट्रपतींनी हा इशारा दिला आहे. संपूर्ण जग कोविड १९ (covid19) साथीच्या विरोधात लढत असताना आपल्या एका शेजारी देशाने अतिक्रमणाचा प्रयत्न केला. पण त्यावेळी आमच्या सैनिकांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली, असे राष्ट्रपती म्हणाले.
अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Mandir)भूमिपूजनाचा क्षण अभिमानाचा होता असेही राष्ट्रपतींनी सांगितले. दीर्घकाळ सुरू असलेल्या या वादात देशातील जनतेने दाखवलेला संयम वाखाणण्याजोगा होता. न्यायव्यवस्थेवर नागरिकांनी विश्वास दाखवला आणि या प्रक्रियेतून हा प्रश्न निकाली निघाला. या निकालाचा आदर सर्वांनी राखल्याने भारताच्या शांतता, अहिंसा, प्रेम या तत्वांची संपूर्ण जगाला प्रचिती आली, असेही राष्ट्रपतींनी म्हटले आहे.
नवीन शिक्षण धोरणामुळे भविष्यातील आव्हानांचे संधीत रुपांतर होणार आहे आणि हाच नवीन भारताचा मार्ग असेल असेही त्यांनी सांगितले. आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या घोषणेमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी घाबरण्याची गरज नसून स्वयंपूर्ण भारतासाठी ही घोषणा आहे, भारत जगापासून फटकून वागणार नाही याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.