रॅपिड अँटी बॉडी टेस्टची ची कोरोना व्हायरस च्या लढाईत उपयुक्तता आहे का?
X
कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रित उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन आज भारतीय वैद्यकीय परिषदेचे (IMA), वरिष्ठ प्रतिनिधी आणि डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून चर्चा केली. कोविड-19 च्या लढ्यात डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी देत असलेल्या योगदानाची दाखल घेत त्यांच्या सुरक्षेविषयीच्या समस्या गृहमंत्र्यांनी जाणून घेतल्या. आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि कल्याणासाठीच्या प्रयत्नांत सरकार कोणतीही कसूर करणार नाही, अशी ग्वाही गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी दिली.
त्यासोबतच, आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून कोविड-19 विषयक सेवा देत असलेले सर्व डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. सध्याच्या काळात, कोविडशी लढा देण्यात वैद्यकीय कौशल्ये आणि सेवा देत असलेले सर्व तज्ञ आणि इतर सहायक या लढ्यात लोकांचे जीव वाचवण्यासाठी सर्वाधिक महत्वाचे आहेत. त्यामुळे, या सर्वांसाठी मनुष्यबळ आणि क्षमता बांधणी प्रशिक्षण, तसेच वैद्यकीय सुरक्षा, कर्मचाऱ्यांसाठींची मार्गदर्शक तत्वे, वेळेत मानधन, भावनात्मक आणि मानसिक आधार, प्रशिक्षण आणि विम्याचे संरक्षण अशा सर्व प्रकारच्या व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
त्याशिवाय, संसर्गजन्य आजार नियंत्रण कायदा 1897 अंतर्गत डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी एक अध्यादेश काढण्याच्या प्रस्तावालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली.
रॅपिड अँटीबॉडी चाचण्या करण्याविषयीचे प्रोटोकॉल ICMR ने सर्व राज्यांना पाठवले आहेत. रॅपिड अँटीबॉडी चाचणी केवळ निरीक्षणासाठी केली जाते. असा पुनरुच्चार त्यात करण्यात आला आहे.
जागतिक स्तरावर देखील या चाचणी विषयीचे अध्ययन विकसित होत असून, व्यक्तीच्या शरीरात किती अँटीबॉडीज तयार होतात, याची माहिती घेण्यासाठी ते उपयुक्त ठरत आहे. या चाचणीचे निकाल आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतात. या चाचण्या, कोविड-19 च्या निदानासाठी, RT-PCR ला पर्याय म्हणून वापरल्या जाऊ शकत नाही, असे ICMR ने स्पष्ट केले आहे.
या आजूबाजूच्या परिस्थितीनुरुप या रॅपिड अँटी बॉडी चाचण्यांची उपयुक्तता कितपत आहे याचे मूल्यमापन करण्यासाठी विविध राज्यांना आकडेवारी संकलित करण्यात मदत करण्याचे आश्वासन ICMR ने दिले असून, त्या संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल, असेही सांगितले आहे. राज्यांनी या चाचण्या करतांना सर्व प्रोटोकॉल पाळावेत, अशी सूचना ICMR ने केली आहे.
केंद्र सरकार, कोविड-19 बाबत दूरध्वनीच्या माध्यमातून एक सर्वेक्षण करणार असून नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर NIC च्या माध्यमातून, 1921 या क्रमांकावरुन संपर्क केला जाईल. हे खरे सर्वेक्षण असून सर्व नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होत, आपली योग्य माहिती, आणि कोविड संदर्भात काही लक्षणे जाणवल्यास ती सांगावी, असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे.
मात्र, अशा स्वरूपाच्या बनावट सर्वेक्षणापासून सावध राहा, असेही आवाहन करण्यात आले आहे. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी या सर्वेक्षणाबाबत जनजागृती करावी, अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण अधिकृत असल्याची माहिती द्यावी असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. राज्यांच्या आरोग्य तसेच इतर विभागांच्या संकेतस्थळावरुनही ही माहिती प्रसारित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत. देशभरात कोविड-19 चे 3870 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर आता 19.36% इतका झाला आहे. आतापर्यंत देशात कोविड-19 च्या एकूण रुग्णांची संख्या 19,984 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 50 जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.
कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: [email protected] आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- [email protected]
कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .