#IndependenceDay: पंतप्रधान मोदींचे टेलिप्रॉम्प्टरविना 87 मिनिटांचे भाषण
X
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिना निमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर देशाला उद्देशून भाषण केले. पंतप्रधान मोदींनी सत्ताग्रहण केल्यापासून सरकारने आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती ते भविष्यातील वाटचालीबाबत सविस्तर विवेचन केले. देशाला उद्देशून असलेले मोदींचे हे भाषण 87 मिनिटांचे होते. पण 87 मिनिटांच्या भाषणात मोदींनी टेलिप्रॉम्पटरचा वापर केला नाही. त्यांनी लिखित मुद्दे वाचून हे भाषण केले. एरवी पंतप्रधान मोदी थेट प्रेक्षकांकडे पाहून भाषण करत असतात. पण यावेळी पंतप्रधान मोदींनी काही मुद्दे वाचून सांगितले.
सरकारच्या उत्तम कामगिरीचा दावा
आपल्या सरकारच्या 7 वर्षांच्या काळात केलेल्या कामांची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. तसेच उज्ज्वला गॅस योजना, प्रत्येक घराला वीज, प्रत्येक घरात नळ कनेक्शन यासारख्या योजना यशस्वी ठरल्याचा दावा त्यांनी केला.
मुलींना सैनिक शाळेत प्रवेश
आपल्या भाषणात मोदींनी यापुढे मुलींना सैनिक शाळेत प्रवेश देण्याची घोषणा केली. तसेच नवा भारत घडवताना देशाची प्रगती सर्वसमावेशक असावी यासाठी प्रत्येकाने प्रतिज्ञाबद्ध असणे गरजेचे असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.
100 लाख कोटींच्या गतिशक्ती राष्ट्रीय योजनेची घोषणा
देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 100 लाख कोटींच्या गतीशक्ती राष्ट्रीय योजनेची पंतप्रधान मोदींनी घोषणा केली. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असेही मोदींनी यावेळी सांगितले. कोरोनाच्या संकटामुळे नव्या वर्ल्ड ऑर्डरची शक्यता आहे, त्यामुळे जग भारताला नव्या दृष्टीने पाहत आहे. दहशतवाद आणि विस्तारवाद या आव्हानांशी देश लढतो आहे, त्याला ठोस उत्तरसुद्धा दिले जाते आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले. २०४७ मध्ये जेव्हा स्वातंत्र्याला १०० वर्ष पूर्ण होतील, तेव्हा जो कोणी पंतप्रधान असेल त्यांना आज केलेल्या संकल्पाचा उल्लेख करता येईल, 25 वर्षांनंतरच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याला गौरव गाथा गायली जाईल, असे मोदींनी यावेळी सांगितले.
आधीच्या सरकारांना श्रेय नाही
पंतप्रधान मोदी यांनी देशाची आतापर्यंत झालेली प्रगती आणि यापुढचे नियोजन आपल्या भाषणात मांडले, पण मोदींनी याआधीच्या सरकारांचा आपल्या भाषणात उल्लेख केला नाही.