टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयातील कोरोना बाधितांमध्ये वाढ ; रुग्णसंख्या 52 वर
देशासह राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका वाढत अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वरच्या जवाहर नवोदय विद्यालयातील कोरोना रूग्णांची संख्या 52 इतकी झाली आहे.
X
अहमदनगर // देशासह राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका वाढत अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वरच्या जवाहर नवोदय विद्यालयातील कोरोना रूग्णांची संख्या 52 इतकी झाली आहे.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नवोदय विद्यालयाला भेट देत परिसर कॅन्टोनमेंट झोन जाहीर केला. नवोदय विद्यालयात 3 दिवसांपूर्वी 19 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते, त्यानंतर सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली, यात आणखी 32 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यात 49 विद्यार्थी, 2 शिक्षक आणि एका कामगाराचा समावेश आहे.त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.
दरम्यान , विद्यार्थ्यांच्या पालकांनी काल आक्रमक होत निगेटिव्ह पाल्यांना पालकांकडे सुपूर्द करण्याची मागणी केली. मात्र, जिल्हाधिकारी भोसले यांनी त्यास नकार दिला. सध्या जरी हे विद्यार्थी निगेटिव्ह असले तरी येत्या काळात काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतच ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल. त्यांना शाळेत आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्याचे आश्वसन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
नवोदय विद्यालयात एकूण 460 विद्यार्थी आणि 51 शिक्षक आणि कर्मचारी आहेत. सध्या 307 विद्यार्थी या ठिकाणी निवासी आहेत. तर 48 कोरोना बाधीत विद्यार्थ्यांना उपचारासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, खासदार सुजय विखे यांनी शाळेला भेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला.त्यानंतर त्यांनी पालकांशी संवाद साधत विद्यार्थ्यांची चिंता करू नका असं सांगितलं. दरम्यान अनेक पालकांनी शाळेतील असुविधांचा पाढा जिल्हाधिकाऱ्यांसमोर वाचला. शाळेत गरम पाण्याची सुविधा नाही, पिण्याच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांना वसतीगृहापासून लांब अंतरावर पायी जावं लागतं, विद्यार्थ्यांशी पालकांचा संवाद होत नाही, विद्यार्थ्यांना मनोरंजनाचे साधन नसल्याने आधीच कोरोनाने घाबरलेल्या विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होतो अशा एक ना अनेक समस्या पालकांनी उपस्थित केल्या. सोबतच शाळेत एकत्र असल्याने विद्यार्थ्यांचा एकमेकांशी संपर्क येऊन आणखी विद्यार्थी बाधित होऊ शकतात असं पालकांचे म्हणणे होते.
दरम्यान जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी पालकांच्या समस्या ऐकुन घेत शाळा प्रशासनाला यावर तातडीने उपाययोजना कराण्याचे निर्देश दिले.तसेच शाळेत अधिकच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली.