हर हर ED, घर घर ED; सामनाच्या अग्रलेखातून भाजपला टोला
हर हर मोदी, घर घर मोदी ते हर हर ED, घर घर मोदी ही घोषणा दिली जात असेल तर बंड करावेच लागेल असे सामनातून म्हटले आहे.
X
गेल्या अनेक दिवसांपासून भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष तीव्र होत आहे. त्यातच केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांवर अंकुश ठेवण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. तर 2014 साली हर हर मोदी, घर घर मोदी ही घोषणा वाराणसी येथून देण्यात आली होती. त्याचा संदर्भ देत आता हर हर ED, घर घर ED अशी नवी घोषणा तयार करत सामनाच्या अग्रलेखातून भाजपला टोला लगावला आहे.
मंगळवारी संजय राऊत यांची मालमत्ता ED ने जप्त केली. त्यामुळे आजच्या अग्रलेखाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यामध्ये आज सामनाच्या अग्रलेखात पंतप्रधान मोदींच्या प्रचारात वापरण्यात आलेल्या घोषणेचा वापर केला आहे.
सध्या उत्तर कोल्हापुर विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूकीचा रणसंग्राम सुरू आहे. या प्रचारात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतदारांना ईडीची धमकी दिली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याचाच संदर्भ देत सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, कोल्हापुर उत्तर पोटनिवडणूकीत भाजपचे उमेदवार म्हणून स्वतः उतरायला हवे होते. तेव्हा ईडीच्या आरोळ्या ठोकता आल्या असत्या. मात्र तसे झाले नाही. त्यांनी कोल्हापुरमधील जनतेची ईडीकडून चौकशी करण्याची योजना बोलून दाखवली. ती योजना छान आहे. तसेच ज्या चार राज्यात भाजपचा विजय झाला तेथेही ईडी लावाच असे अग्रलेखात म्हटले आहे. तर याची सुरूवात गोव्यातील पणजी आणि साखळ मतदारसंघापासून करायला हवी. तर त्यातून सत्य बाहेर येईल. त्यामुळे मोदी यांच्या हर हर मोदी, घर घर मोदी या घोषणेला जोडून कोणी हर हर ईडीची घोषणा देत असेल तर लोकांना बंड करावेच लागेल, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, भाजपने साम, दाम, दंड आणि भेद अशा सर्व बाबी वापरुन निवडणूका जिंकायचे असेल असे भाजपने ठरवले असल्याचे म्हटले आहे. तर कोल्हापुर पोटनिवडणूकीत लक्ष्मीदर्शन होणार असल्यामुळे आणि हे पैसे डिजिटली पाठवले जाण्याची भीती भाजपने व्यक्त केली. त्यामुळे जर अशा प्रकारे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले तर तुमचीही ईडीकडून चौकशी होईल असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावरून सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.
ED म्हणजे भाजपचा घरगडी असे उध्दव ठाकरे यांनी म्हटले होते. त्याचा प्रत्यय कोल्हापुर निवडणूकीमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने आला, असा टोला सामनाच्या अग्रलेखातून लगावला. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून ब्लॅकमेल करणे अमित शहा यांना मान्य आहे का? असा सवाल सामनातून विचारला आहे. याबरोबरच अशा कोणत्याही प्रकारच्या धमक्यांना कोल्हापुर भीक घालणार नाही. त्यामुळे निकालातून कोल्हापुरचा इंगा दाखवतील हो सत्य आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.