परतूर तालुक्यात पुराच्या पाण्यात तिघे जण वाहून गेले
X
पुराच्या पाण्यातून पुलावरून मोटारसायकल घेऊन जाताना तिघेजण जण वाहून गेल्याची घटना घडली, दोघांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश आलं आहे, तर एकाचा शोध सुरु आहे. परतूर तालुक्यातील बामणी गावातील ही घटना असून, वाहून गेलेले आसाराम खालापुरे यांचा शोध सुरु आहे,घटनेची माहिती मिळताच तहसीलदार रूपा चित्रक घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले आहेत.
गावाचे उपसरपंच राजेंद्र खालापुरे, वय 35, आसाराम खालापुरे, वय 55, ग्रामपंचायत सदस्याचे पती आणि वालखेडचे 32 वर्षीय लखन कांबळे हे रात्री परतूरहून बामनी गावाकडे जात असताना ही घटना घडली.
दिवसभर संततधार पावसामुळे बामनी गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद झाला. रात्री पुलावरून पाणी वाहत असल्याने तिघांनी एकमेकांना धरून पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आसाराम खालापुरे यांचा पाय घसरला आणि तिघेही पाण्यात वाहून गेले. दोन जणांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले आहे.
बेपत्ता झालेले आसाराम खालापुरे यांना रात्री पुलावरून व नदीमध्ये उशिरापर्यंत शोधण्यात आले. मात्र ते मिळून आले नाही.
दरम्यान राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस होत असल्याने अनेक नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत, अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे नागरिकांनी पुराच्या पाण्यात वाहने घालू नयेत असे आवाहन वारंवार प्रशासनाकडून केलं जातं आहे. मात्र तरी काही बेजबाबदार नागरिक जीव धोक्यात घालताना दिसत आहेत.