केंद्रसरकारने हेडलाईन मॅनेजमेंट करु नये - नवाब मलिक
X
केंद्रसरकारने निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट करण्याऐवजी लसीकरणासंदर्भात देशाचा एक चार्ट बनवून देशातील जनतेसमोर ठेवावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठका घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे. परंतु बैठका घेऊन फक्त या महिन्यात १२ कोटी, डिसेंबरपर्यंत २१० कोटी लसी उपलब्ध होईल असे सांगणे किती योग्य आहे असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार याची माहिती दिली पाहिजे. केंद्र किती खरेदी करणार, राज्यांना किती मिळणार आणि खाजगी लोकांना खरेदी करुन त्यांनी त्याचा वापर किती करावा याबाबतची स्पष्टता केंद्रसरकारने आजपर्यंत जाहीर केलेली नाही असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
कधी प्रकाश जावडेकर वेगळं बोलतात. तर कधी जे. पी. नड्डा वेगळी घोषणा करतात. फक्त वेगवेगळ्या हेडलाईन होण्यासाठी हे लोक बोलत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे.
१२ कोटी लस पुरवठा जूनपर्यंत होणार होता. मात्र, आजपर्यंत किती पुरवठा झाला असा सवाल करतानाच कालपर्यंत लसीकरण केंद्रे बंद होती. जी सत्यता आहे ती स्वीकारली पाहिजे आणि त्यानुसार कार्यक्रम बनवून देशासमोर ठेवावा. अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.