मरण स्वस्त झालं, एकाच चितेवर आठ जणांवर अंत्यसंस्कार
X
बीड: राज्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. या लाटेच मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सुद्धा वाढताना दिसते आहे, अनेकांना बेड मिळत नाहीये तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करायला जागासुद्धा मिळत नाहीये. त्यामुळे एकाचवेळी आठ कोरोनाबाधित रुग्णांवर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ बीड जिल्ह्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील स्वाराती रुग्णालयात सात आणि लोखंडीच्या कोविड सेंटरमधील एक अशा एकूण आठ कोविड मृतांवर नगरपालिका प्रशासनाने मांडवा रोडवरील स्मशानभूमीत मंगळवारी एकाच सरणावर अंत्यसंस्कार केले. मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने मरण स्वस्त झाले असेच म्हणावे लागेल. बीड जिल्ह्यात कोरोनाने मंगळवारी नवीन उच्चांक गाठला असून, एकाच दिवसात तब्बल 617 नवीन रुग्ण आढळले आहे. तर 10 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्णांचा वाढता आकडा चिंताजनक आहे.