मॅक्स महाराष्ट्रचा इम्पॅक्ट, पारधी समाजातील १५० जणांची मुक्तता
X
आळंदी, पुणे - ११ जून (रविवार) रोजी आळंदी येथून आषाढीवारीला सुरुवात झाली. दरवर्षी पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीला असंख्य वारकरी जातात. सुमारे ३०० वर्षांपासून महाराष्ट्रात वारीची परंपरा आहे. लाखों वारकरी या दिंडीत सहभागी होत पंढरपुरकडे जातात. परंतु ही दिंडी आळंदीत असताना पारधी समाजातील १५० जणांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले होते. यामध्ये लहान मुलं, गर्भवती महिलांचा समावेश होता. यासंदर्भात सर्वप्रथम मॅक्स महाराष्ट्रनं आवाज उठवला. त्यानंतर यासर्वांची मुक्तता करण्यात आली.
दरम्यान, नजरकैदेत ठेवलेल्या अनेकांना श्वसनाचा त्रास झाला. एका व्यक्तीला फिट आल्याने त्याची तब्बेत बिघडली होती. त्यांच्या अन्न-पाण्याची देखील सोय केली गेली नव्हती. त्यांचे मोबाइल ही जप्त करण्यात आल्याचं यापैकी एकाने सांगितलं. तर काहीच कारण नसताना आम्हाला उघड्यावर झोपवलं, अंगावर ही काही नसल्याचं एका महिलेनं सांगितलं.
या विषयी माहिती मिळताच मॅक्स महाराष्ट्रनं घटनेचं गांभिर्य लक्षात घेऊन तात्काळ यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध केली. या घटनेसंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या सुनीता भोसले म्हणाल्या,” कालची घटना ही काळिमा फासणारी होती. पारधी समाजातील लोकांना त्यांची बोलीभाषा, त्यांचं वागणं, गुन्हेगारी प्रवृती असल्याचा संशय घेत पोलिसांना या गरीब आदिवासी मुलांना अन्न पाण्याविना नजरकैदेत ठेवले होते. परंतु मॅक्स महाराष्ट्रच्या बातमी नंतर १२ तासाच्या आत पोलिसांनी १५० लोकांची मुक्तता केली असल्याचं सुनिता भोसले यांनी सांगितलं.