MaxMaharashtra Impact : पोक्सो कायद्याबाबतच्या वादग्रस्त आदेशात सुधारणा करत नवा आदेश जारी
X
मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी पॉक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात जारी केलेल्या नवीन आदेशावरून वाद निर्माण होऊ शकतो आणि असे आदेश बेकायदा ठरू शकतात, अशा स्वरुपाची भूमिका मॅक्स महाराष्ट्रने मांडली होती. तसेच या मुद्द्यावर राज्यात सर्वप्रथम तज्ञांशी बोलून चर्चा देखील घडवून आणली होती. यानंतर राज्य बालहक्क आयोगानेही या आदेशाला आक्षेप घेत हे आदेश मागे घेण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले होते. पोलिस आयुक्तांच्या या निर्णयाला कोर्टात देखील आव्हान देण्यात आले आणि हे आदेश पोलिस आयुक्त मागे घेणार का अशा स्वरुपाची विचारणा कोर्टाने केली. यानंतर 23 जून रोजी भूमिका मांडण्यासाठी पोलीस आयुक्तांतर्फे वेळ मागून घेण्यात आला, दरम्यान हे नवीन आदेश आता जारी करण्यात आले आहेत.
लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजे पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल दाखल कऱण्यासाठीपोलिस उपायुक्तांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे आदेश मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी दिले होते. मात्र या आदेशाला महिला व बालहक्कासाठी लढणाऱ्या संघटनांनी विरोध केला. त्यामुळे अखेर मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी नवे आदेश जारी केले आहेत.
संजय पांडे यांनी नवे आदेश जारी करत त्यामध्ये म्हटले आहे की, पोलिस ठाण्यात भादंवि कलम 354 नुसार विनयभंग किंवा पोक्सो कायद्यांतर्गत तक्रार प्राप्त होताच ज्या तक्रारीत दखलपात्र गुन्हा निष्पण्ण होतो किंवा संबंधीत गन्ह्यासंदर्भात संशय निर्माण होतो. त्या तक्रारीवर तातडीने कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट नवे आदेश जारी केले आहेत.
मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी 6 जून रोजी पत्रक काढून पोक्सो कायद्यांतर्गत गु्न्हा दाखल करण्यासाठी पोलिस उपायुक्तांची परवानगी आवश्यक असल्याचे आदेश दिले होते. तर हे आदेश बदनामीसाठी खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी असल्याचे म्हटले होते. मात्र या आदेशानंतर महिला व बालहक्कासाठी लढणाऱ्या संघटनांनी विरोध केला. त्यामुळे अखेर मुंबई पोलिसांनी नवे आदेश जारी केले आहेत. तर या आदेशानुसार पोक्सोंतर्गत दाखल करण्यात आलेली तक्रार तातडीने पडताळणी करून या प्रकरणात तथ्य असेल तर आरोपीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान उच्च न्यायालयाने मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे आणि राज्य सरकारला हे आदेश पुन्हा मागे घेणार का? असा सवाल केला होता. त्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी नवे आदेश जारी केले आहेत.
दरम्यान नव्याने जारी करण्यात आलेल्या आदेशातही पोलीस आयुक्तांनी केवळ शब्दांचा खेळ केला आहे, असा आक्षेप बालहक्क आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह यांनी नोंदवला आहे. आधीच्या आदेशातील भूमिका कायम ठेवत, पॉक्सो किंवा विनयभंगाची तक्रार आल्यास वरिष्ठांशी बोलून आणि संशयास्पद नसल्याचे जाणवले तरच गुन्हा दाखल करावा असे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे नवीन आदेशही वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. आता कोर्टात पोलीस आयुक्त काय भूमिका मांडतात आणि कोर्ट काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.