Home > News Update > वैज्ञानिक संशोधनासाठी सोडलेले फुगे आढळल्यास प्रशासनाला कळवा आणि बक्षीस मिळवा

वैज्ञानिक संशोधनासाठी सोडलेले फुगे आढळल्यास प्रशासनाला कळवा आणि बक्षीस मिळवा

वैज्ञानिक संशोधनासाठी अवकाशात फुगे सोडले आहेत. हे फुगे आढळून आल्यास काय करावे? याविषयी प्रशासनाने सूचना जारी केली आहे.

वैज्ञानिक संशोधनासाठी सोडलेले फुगे आढळल्यास प्रशासनाला कळवा आणि बक्षीस मिळवा
X

टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च हैद्राबाद या संस्थेकडून वैज्ञानिक संशोधनासाठी दि. 1 नोव्हेंबर 2022 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत अवकाशात 10 बलून फ्लाईटस् सोडण्यात येत आहेत. या बलूनमध्ये वैज्ञानिक उपकरणे असून ठराविक कालावधीनंतर वैज्ञानिक उपकरणे मोठ्या रंगीत पॅराशुटसह महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, सांगली, सातारा, अहमदनगर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, जळगाव आणि सोलापूर जिल्ह्याच्या स्थलसीमा हद्दित जमिनीवर खाली येण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तींना ही उपकरणे दृष्टीस पडतील त्यांनी या उपकरणांना स्पर्श करू नये. या फुग्यांबाबत कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये. अशी उपकरणे आढळून आल्यास नजिकच्या पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफीस, स्थानिक प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.

अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या बलून फॅसिलिटीमधून फुगे सोडले जात आहेत. हे फुगे पातळ (पॉलीथिलीन) प्लास्टिक फिल्म्सपासून बनवलेले असून 50 मीटर ते 85 मीटर व्यासाचे असतात. ते हायड्रोजन वायूने भरलेले असतात. संशोधनासाठी वैज्ञानिक उपकरणे वाहून नेणारे फुगे, हाती घेतलेल्या प्रयोगानुसार 30 किमी ते 42 किमी दरम्यान उंची गाठतील अशी अपेक्षा आहे. काही तासांच्या कालावधीनंतर ही उपकरणे मोठ्या रंगीत पॅराशूटसह जमिनीवर खाली येतात. सुमारे 20 ते 40 मीटर लांबीच्या एका लांब दोरीवर, त्याच्या खाली लटकलेली उपकरणे असलेले पॅराशूट, साधारणपणे हळू हळू जमिनीवर येतात. ही उपकरणे हैदराबादपासून सुमारे 200 ते 350 किमी अंतरावर असलेल्या बिंदूंवर उतरू शकतात. विशाखापट्टणम-हैदराबाद-सोलापूर मार्गावर, आंध्रप्रदेश, उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये हे बलून वाहतील.

वैज्ञानिक संशोधनासाठी ठेवण्यात आलेली उपकरणे अत्यंत संवेदनशील आहेत आणि त्यांच्याशी छेडछाड केल्यास मौल्यवान वैज्ञानिक माहिती नष्ट होईल. त्यातील काही उपकरणांवर उच्च व्होल्टेज असू शकतात ती उघडण्याचा अथवा हाताळण्याचा प्रयत्न केल्यास धोकादायक ठरू शकतात. ही उपकरणे जमिनीवर खाली आल्याबाबत माहिती दिल्यानंतर प्रयोग करणारे शास्त्रज्ञ उपकरणे गोळा करतील आणि शोधकर्त्याला योग्य बक्षीस देतील. तसेच टेलिग्राम पाठवणे, दूरध्वनी करणे, माहिती पोहोचवण्यासाठी प्रवास करणे इत्यादी सर्व वाजवी खर्च देतील. मात्र उपकरणासोबत कोणतीही छेडछाड केल्याचे आढळून आल्यास कोणतेही बक्षीस दिले जाणार नाही.

सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दित ही उपकरणे ज्यांना आढळून येतील त्यांनी त्वरीत जवळचे पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफीस, स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.

Updated : 16 Nov 2022 11:46 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top