ओबीसी आरक्षण टिकवता येत नसेल, तर राजीनामा देऊन घरी बसा- बाळासाहेब सानप
X
बीड : ओबीसीच्या मंत्री आणि जेष्ठ नेत्यांना ओबीसीचे आरक्षण टिकवता येत नसेल, तर त्यांनी राजीनामा देऊन घरी बसावं अशी संतप्त प्रतिक्रिया ओबीसी व्हीजेएनटी मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिली आहे.ओबीसीचे आरक्षण संपत असताना उघड्या डोळ्याने पाहाणाऱ्या सत्ताधारी पक्षातील ओबीसीचा नेता म्हणून घेणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. अशावेळी तुम्ही शांत बसत असाल, तर ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून घरी बसवेल, असा इशारा सानप यांनी दिला. ते बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. सुप्रीम कोर्टाने ओबीसींच्या राजकिय आरक्षणाला स्थगिती दिली, अशावेळी महाराष्ट्रातील ओबीसीचे नेते आणि मंत्री उघड्या डोळ्याने बघत आहेत. मात्र, त्यांचे ओबीसीकडे लक्ष नाही. स्वतःचा राजकारणासाठी फक्त ओबीसीचा वापर करून घेण्यासाठी हे नेते पुढे येतात असं सानप म्हणाले.
मात्र, ओबीसी समाज तुम्हाला घरी बसवल्या शिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील ओबीसींचे नेते म्हणत होते, की कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक होऊ देणार नाही. आता नगरपंचायत निवडणूक लागली आहे, या महाराष्ट्रातल्या ओबीसी नेत्याना मंत्र्याना हे माहीत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.