प्रजासत्ताक दिनाच्या आधी दिल्लीत सापडली स्फोटकं, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
X
प्रजासत्ताक दिनाच्या अवघ्या काही दिवस आधी दिल्लीमध्ये घातपात घडवण्याचा कट उधळण्यात आला आहे. पण या निमित्ताने राजधानी दिल्लीमधील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. देशाची राजधानी नवी दिल्लीतील गाझीपूर भागातील फुल बाजारामध्ये एक बेवारस बॅग पडली असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तिथे मोठी खळबळ उडाली. या बॅगची लोकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तो परिसर लगेच रिकामा केला. त्यानंतर बॉम्ब निकामी करणारी टीम तिथे पोहोचली होती. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने तिथे एक खड्डा खणण्यात आला आणि स्फोटकं निकामी केली गेली. नियंत्रित पद्धतीने स्फोट घडवून ती नष्ट केली गेली.
सापडलेली स्फोटकं ही IED होती. त्यामुळे इथे स्फोट झाला असता तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता होती. ही स्फोटकं इथे कुणी आणून ठेवली याचा शोध आता पोलीस घेत आहेत. तसेत नष्ट कऱण्यात आलेल्या IEDचे काही नमुने ताब्यात घेण्यात आले असून त्याचा अभ्यास केल्यानंतर महत्त्वाची माहिती पुढे येऊ शकते. तर दुसरीकडे पंजाबमध्येही ५ किलो एवढ्या मोठ्या प्रमाणात IED जप्त कऱण्यात आले आहे. यामझ्ये २ किलो सातशे ग्रॅम RDX, 1 किलो ३०० ग्रॅम छर्रे, वायर, इलेक्ट्रिक डिटोनेटर आणि डिजिटल टायमरही सापडले आहे. इथेही मोठ्या घातपाताचा प्रयत्न होता अशी माहिती अमृतसरचे आयजी मोहनीश चावला यांनी दिली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकं देशात सापडत आहे, पाच राज्यांच्या निवडणुका, प्रजासत्ताक दिन या पार्श्वभूमीवर अशा घटनांमुळे देशांतर्गत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.