Home > News Update > 'गडकरींकडून गलती से मिस्टेक' म्हणाले मला निर्णयाची माहितीच नव्हती...

'गडकरींकडून गलती से मिस्टेक' म्हणाले मला निर्णयाची माहितीच नव्हती...

गडकरींकडून गलती से मिस्टेक म्हणाले मला निर्णयाची माहितीच नव्हती...
X

देशात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता कोरोनाला रोखण्यासाठी लसींची आयात करावी, तसंच देशात लसींची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. अशी चर्चा सुरु असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका ऐवजी दहा कंपन्यांना लस निर्मितीचं लायसन्स दिलं पाहिजे, अशी सूचना केंद्र सरकारला केली होती.

स्वदेशी जागरण मंचच्या एका कार्यक्रमात त्यांनी हा सल्ला दिला होता. त्यांच्या या विधानानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

जयराम रमेश यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या पत्राची गडकरी यांना आठवण करुन दिली होती. एप्रिल महिन्यात मनमोहन सिंह यांनी मोदी यांना पत्र लिहिलं होतं. या पत्राता धागा पकडत जयराम रमेश यांनी आपल्या ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला होता.

'18 एप्रिलला डॉक्टर मनमोहन सिंह यांनी हिच बाब सुचवली होती. मात्र, आपले बॉस ऐकत नाही?'

कॉंग्रेसच्या या टिकेनंतर नितीन गडकरी यांनी आता सारवासारव केली आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दलची मला माहिती नव्हती, असं ट्वीट गडकरी यांनी केलं आहे.

"स्वदेशी जागरण मंचच्या पत्रकार परिषदेत मी काल बोलताना कोरोना लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी एका ऐवजी दहा कंपन्यांना लस निर्मितीचं लायसन्स द्या, असा सल्ला मी दिला होता. मात्र, हा निर्णय खते आणि रसायन मंत्रालयाने आधीच घेतला असून त्यावर कामही सुरू झाल्याचं मला माहीत नव्हतं. पत्रकार परिषदेनंतर मला त्याबाबत सांगण्यात आलं. 12 कंपन्यांनी लसीचं उत्पादन सुरू केल्याची माहिती मला देण्यात आली. मला त्याबद्दल माहीत नव्हतं. त्यामुळे मी सल्ला दिला होता. मात्र, केंद्र सरकारने आधीच योग्य पाऊल उचललं. त्याचा मला आनंदच आहे,"

असं ट्वीट गडकरी यांनी केलं आहे.

Updated : 19 May 2021 10:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top