Home > News Update > पवारानंतर चव्हाणांना इन्कम टॅक्सची नोटीस

पवारानंतर चव्हाणांना इन्कम टॅक्सची नोटीस

पवारानंतर चव्हाणांना इन्कम टॅक्सची नोटीस
X

पृथ्वीराज यांना ऐन दिवाळीतच आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत त्यांनी आज माध्यमांना माहिती दिली. या नोटिशीला २१ दिवसांत उत्तर द्यायचं असून प्रत्यक्ष हजर राहण्यासही सांगण्यात आले आहे. त्यादृष्टीने आम्ही योग्य ती कार्यवाही करत आहोत, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. ही नोटीस म्हणजे आयकर विभागाच्या नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचे नमूद करतानाच चव्हाण यांनी यावेळी केंद्रातील भाजप सरकारलाही लक्ष्य केले.

गेल्या दहा वर्षांत तुमचे उत्पन्न कसे वाढले याची विचारणा इन्कम टॅक्स विभागाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली असून याबाबत खुलासा करण्यासाठी 8 ते 10 दिवसात इन्कम टॅक्स कार्यालयात समक्ष स्वतः हजर राहावे असे दिलेल्या नोटीसीत सांगण्यात आले आहे. काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि या नोटिसीला रीतसर उत्तर देणार असल्याच यावेळी त्यांनी सांगितले.

शरद पवार यांना बजावण्यात आलेल्या नोटीसवर बोट ठेवत चव्हाण यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर आपले परखड मत व्यक्त केले. सत्तेचा वापर कसा करायचा?, तो कोणासाठी करायचा?, याबाबत भाजपने नियोजनबद्धपणे व्यूहरचना केली आहे. त्यानुसार सगळं काही सुरू असतं. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना अशीच नोटीस आली होती आणि आता मला नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यावर योग्यते स्पष्टीकरण मी देणारच आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

केंद्रातील मोदी सरकार व भाजपला तुम्ही सातत्याने लक्ष्य करत आहात. देशाच्या आर्थिक स्थितीपासून ते कृषी कायद्यांपर्यंत अनेक मुद्द्यांवर तुम्ही सरकारवर आरोप केले आहेत. त्यामुळेच तुम्हाला त्रास देण्यासाठी, तुमचे खच्चीकरण करण्यासाठी ही नोटीस बजावली गेली आहे असे वाटते का, असे विचारले असता तसे काही असेल असे मला वाटत नाही मात्र, सत्तेचा वापर कसा करायचा हे भाजपला चांगलं माहीत आहे, इतकेच मी म्हणेन, असे विधान चव्हाण यांनी केले आहे.


Updated : 18 Nov 2020 5:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top