'मला आर्यन खान प्रकरणाच्या तपासातून वगळण्यात आलेले नाही ' ; समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया
X
मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातून NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना हटवण्यात आले आहे. आता NCB ची नवी टीम मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणार आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या केसचा देखील समावेश आहे. समीर वानखेडे यांच्यावर वसुलीचे आरोप झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान समीर वानखेडे यांनी या कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणातून समीर वानखेडे यांना हटवल्यानंतर दिल्ली NCB चे एक पथक आज मुंबईत येत आहे. हे पथक मुंबई झोनमधील आर्यन खान प्रकरणासह इतर ५ अशा ६ प्रकरणांची चौकशी करणार आहे.
दरम्यान NCB चे उपमहासंचालक मुथा अशोक जैन म्हणाले की, आमच्या झोनच्या एकूण ६ प्रकरणांची चौकशी आता दिल्लीच्या NCB टीमकडून केली जाणार आहे, ज्यात आर्यन खानचे प्रकरण आणि इतर ५ प्रकरणांचा समावेश आहे. हा प्रशासकीय निर्णय होता.
तर समीर वानखेडे यांनी सांगितले की, "मला तपासातून हटवण्यात आलेले नाही. या प्रकरणाचा तपास कोणत्या तरी केंद्रीय एजन्सीमार्फत व्हावा, अशी मी न्यायालयात याचिका देखील केली होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरण दिल्ली NCB ची एसआयटीकडे देण्यात आलं आहे. दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी टीममध्ये हा एक समन्वय आहे."