Home > News Update > सांगलीत अवकाळी पावसाचा द्राक्ष बागायतदारांना फटका ; ११ हजार ९३९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

सांगलीत अवकाळी पावसाचा द्राक्ष बागायतदारांना फटका ; ११ हजार ९३९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

सांगलीत अवकाळी पावसाचा द्राक्ष बागायतदारांना फटका ; ११ हजार ९३९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान
X

सांगली : सांगली जिल्ह्यात मागील चार दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष, ज्वारी, हरभरा, भाजीपाल्यासह ११ हजार ९३९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे.

द्राक्ष बागांचे सर्वाधिक १० हजार ६३९ हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने शनिवारी राज्य शासनाकडे सादर केला. प्राथमिक अहवालानुसार द्राक्षबागांचे सुमारे १३ ते १५ हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, राज्य सरकारकडून मात्र अद्याप नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

सांगली जिल्ह्यात बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे जोरदार पाऊस झाला, तर गेल्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. कमी अधिक प्रमाणात अजूनही पाऊस सुरूच आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस, कडेगाव, इस्लामपूर, वाळवा, शिराळ्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. जिल्ह्यातील पूर्व भागासह पूर्ण जिल्ह्यातील काढणीला आलेले आणि फुलोर्‍यात असणार्‍या द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं आहे.

अनेक ठिकाणी द्राक्ष बागांमध्ये पाणी साचलं असून, द्राक्षांचे घड कुजण्याच्या स्थितीत आहे. या अवकाळी पावसाचा रब्बीच्या पिकांनाही फटका बसला. भाजीपाल्याचंही मोठे नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने कृषी विभागाने नुकसानीची पाहणी करीत प्राथमिक माहिती घेतली.

या भागात पावसाचा फटका

आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, वाळवा, मिरज, कडेगाव, पलूस, जत तालुक्यांतील ३८४ गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. जोरदार पावसाने नऊ तालुक्यातील ३८४ गावांमधील २६ हजार ८४२ शेतकर्‍यांच्या १० हजार ६३९.४७ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षबांगांचे मोठे नुकसान झाले. द्राक्ष मण्यांना तडे जाऊन द्राक्षांचे घड खराब होण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडला असून राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा केली जात आहे

Updated : 5 Dec 2021 9:00 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top