Home > News Update > ही आग कशी विझवणार? : सामना

ही आग कशी विझवणार? : सामना

फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवण्यासाठी १४ ऑगस्ट हा दिवस निवडला. हा पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आहे. फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या, की या स्मृतींना कायमची तिलांजली देऊन वेदना देणाऱ्यांवर प्रहार करायचा, यावर चिंतन झाले असते तर बरे झाले असते अशा शब्दात सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली आहे.

ही आग कशी विझवणार? : सामना
X


दोन्ही देशांमधली दुभंगलेली मनं दुरुस्त करण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना लाहोरला बस घेऊन गेले. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी अचानक गेले. ही वेदना संपावी हे मोदींच्याही मनात होतेच. आता त्यांनी त्या वेदनेची खपली उचकटून काढली, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

वेदनेचा दाह फक्त उक्तीने शमणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष कृती देखील करावी लागेल. विद्यमान सत्ताधारी ती कृती करणार आहेत काय? देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्याचा उत्सव वर्षातून एकदा साजरा होतो. पण फाळणीची वेदना सदैव मन जाळीत असते. ही आग कशी विझवणार?" असा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. अखंड हिंदुस्थान हाच फाळणीच्या वेदनेवर उतारा होता, असं देखील या अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.

सावरकरांसारखे प्रखर हिदुत्ववादी द्विराष्ट्र सिध्दांताचे पुरस्कार करत होते. हिंदुमहासभा देखील त्याच विचाराची होती. भाजपचे लालकृष्ण अडवाणी फक्त फाळणीचे साक्षीदार आहेत. त्यांनी जे भोगले ते अनकेदा पुढच्या प्रवासात उफाळून आले, असं सामनानं म्हटलं आहे.

"फाळणीवर उतारा म्हणून भाजपाने पाकव्याप्त काश्मीर पुन्हा जिंकण्याचा निर्धार केला. अखंड हिंदुस्थानचा गजर केला. फाळणीच्या वेदनेवर तोच उतारा होता. पण फाळणीच्या वेदनेचा प्रतिशोध घेण्याचं राष्ट्रकार्य फक्त इंदिरा गांधी करू शकल्या. इंदिरा गाधींनी पाकिस्तानची फाळणी घडवून पहिल्या फाळणीच्या वेदनेवर फुंकर घातली. पाकिस्तानच्या द्विराष्ट्रवादाचा पायाच उखडून टाकला. फाळणीची वेदना होती व आहेच. फक्त त्या वेदनेतून आणखी एका फाळणीची बिजं रोवली जाऊ नयेत, हे सध्याच्या राज्यकर्त्यांनी पाहायला हवे", असं देखील यात म्हटलं आहे.

देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव वर्षातून एकदा साजरा होता, पण फाळणीच्या वेदना सदैव मन जाळीत असतात ही आग कशी विझवणार असा प्रश्न सामना संपादकीय मधून शेवटी उपस्थित करण्यात आला आहे.

Updated : 16 Aug 2021 10:00 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top