...आणि "बैल" बोधचिन्हावर अजरामर झाला!
X
आज बैल पोळा आहे. बैलाप्रती कृतज्ञता म्हणून आमच्या कोल्हापूर भागात कर्नाटकी बेंदूर साजरा करतात. तर महाराष्ट्राच्या काही भागात महाराष्ट्र बेंदूर साजरा होतो. (बैलपोळा, बेंदुर या शब्दांचे अर्थ शोधले पाहिजेत.) बैल हा कृषीवलांचा जणू सखाच आहे. मोहनजोदरो सारख्या अतिप्राचिन मानवी वसाहतीच्या अवशेषातही या बैलांच्या मुद्रा मिळाल्या आहेत. आपले युद्ध दैवत महादेवाचे अस्तित्व तर नंदी म्हणजेच बैल याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आजही भारतात आसेतू हिमालय बैलाचे स्थान किमान व्यवहारात टिकून आहे. खास करुन महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू या कृषीवलांच्या राज्यात बैलाचे महत्त्व अजून टिकून आहे. या बैलांच्याही अनेक जाती आहेत.
आमच्या कोल्हापूर परिसरात बैल म्हटले की, शेतकरी सहकारी संघाच्या लोगो वरील बैलाचे छायाचित्र लगेच नजरे समोर येते. गेले अनेक वर्ष हे बैलाचे चिन्ह शेतकऱ्यांच्या या प्राण्याविषयी असणाऱ्या प्रेमाचे प्रतिक म्हणून वापरात आहे. हे बैलाचे चित्र काल्पनिक नसून या चित्रातील बैल हा संस्थान काळातील नामवंत बैल होता. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील तुकाराम भाऊ दळवी या तोलदार शेतकऱ्याने खिलार जाती हा बैल सन १९३५ मध्ये कर्नाटकातील करमणी गावाहून विकत घेतला होता.
झुंजीसाठी आणलेल्या या बैलाने त्यावेळी झुंजीत अनेक नामवंत बैलांना मात दिली होती. ही गोष्ट राजाराम छत्रपतींना समजल्यावर त्यांनी हा बैल तुकाराम दळव्यांकडून मागून घेतला. राजाराम महाराजांना अशा उमद्या जनावरांची आवड होती. राजाराम महाराजांनी या बैलाला देशभर होणाऱ्या पशूंच्या प्रदर्शनात पाठवले. जिथे हा बैल गेला तिथे त्याने बक्षीस जिंकले. सन १९३९ मध्ये दिल्ली येथे अखील भारतीय जनावरांचे प्रदर्शन भरले होते. त्यात अखंड भारतातील इतर जनावरे व बैल प्रदर्शनात आले होते. त्या प्रदर्शनात या बैलाने सर्वोत्तम बैल म्हणून पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळवले व त्या वेळेचा धार चँलेंज कप जिंकून घेतला होता.
कोल्हापूरच्या या बैलाने त्यावेळी असे देशभर नाव कमावले. पुढे हा बैल राजाराम महाराजांनी वडगाव शेरीकडे देखभालीसाठी दिला. या नामांकित बैलाचे निधन झाल्यानंतर त्याची पेठ वडगाव जवळ समाधीही बांधली गेली होती. ती महामार्ग रुंदी करण्यात रस्त्यात गेली. पण या बैलाची आठवण शेतकरी सहकारी संघाच्या बोधचिन्हा वर कायम जागृत राहिली आहे.
(सोबतचे छायाचित्र शेतकरी संघाच्या बोधचिन्हा वरील आहे. जे या संघाच्या स्थापने पासून वापरले जाते.)
इंद्रजित सावंत
कोल्हापूर.