१५ फेब्रुवारीच्या विमान प्रवासाबाबत अनिल देशमुख यांचा खुलासा
X
परमबीर सिंग यांनी केलेल्या शंभर कोटी रुपये खंडणीच्या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख हे अडचणीत आले आहेत. पण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी परमबीर सिंगांचे आरोप खोटे असल्याचे सांगत देशमुख यांच्या राजीनाम्य़ाची गरज नाही असे स्पष्ट केले आहे. यावेळी शरद पवारांनी परमबीर सिंग यांनी सांगितलेला सचिन वाझे आणि गृहमंत्र्यांच्या भेटीचा कालावधी चुकीचा असल्याचा दावा केला. कारण ५ ते १५ फेब्रुवारी अनिल देशमुख हे कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये एडमिट होते. त्यानंतर ते १५ ते २७ फेब्रुवारी होमक्वारंटाईन होते.
पण या दरंम्यान आता अनिल देशमुख यांनी आपण १५ फेब्रुवारीला खासगी विमानाने मुंबईला आलो आणि तिथल्या बंगल्यात क्वारंटाईन होतो असे सांगितले आहे. तसेच क्वारंटाईनच्या कालवधीत आपण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रम आणि कामकाजात सहभागी झालो होतो, असेही सांगितले आहे. होम क्वारंटाईन झाल्यानंतर आपण लॉकडाऊनच्या नियमानुसार रात्री उशिरा पार्कमध्ये प्राणायाम करण्यासाठी जात होतो. एक मार्चपासून अधिवेशन होतं त्यामुळे त्या कामाला आपण लागलो होतो. या दरम्यान अधिवेशनासाठी प्रश्नोत्तरं, लक्षवेधी सूचना याबाबतच्या बैठकांसाठी आपल्या शासकीय निवासस्थानी अनेक अधिकारी येत जात होते, अशीही माहितीही त्यांनी दिली आहे. त्यानंतर शासकीय कामानिमित्त पहिल्यांदाच २८ फेब्रुवारी रोजी घराच्या बाहेर पडल्याचे त्यांनी सांगितले आहे.
एवढे सगळे सत्य असूनही काही माध्यमे आपल्याबाबत चुकीची माहिती देत असल्याने आपण व्यथित झाला आहोत, असेही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.