सहकार क्षेत्रातील राजकारण थांबवावे, अमित शाह यांचा राज्य सरकारला इशारा
X
सहकार चळवळीचा सगळ्यात जास्त विकास ज्या महाराष्ट्रात झाला त्याच महाराष्ट्रात राज्य सरकार सहकारी चळवळीत राजकारण करत आहे, अशी टीका केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी केली आहे. प्रवरानगरमध्ये सहकार परिषदेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. आपण सहकार खात्याचे मंत्री म्हणून आलो असलो तरी आपण तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी आलो आहोत, असे सांगत अमित शाह यांनी राज्य सरकारवर सहकार क्षेत्रात पक्षपात करत असल्याची टीका केली. सरकारने राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करावा असे आवाहनही त्यांनी केले. पण त्याचवेळी महाराष्ट्रातील सरकारची पक्षपाती भूमिका आपण मूकदर्शक बनून बघू शकत नाही, असा इशाराही अमित शाह यांनी यावेळी दिला.
राज्यातील अनेक कारखान्यांच्या समस्या केंद्रात चर्चेला का येतात. राज्य सरकार पक्ष बघून मदत करतंय, असा थेट आरोपही अमित शाह यांनी दिला. तसेच आता सहकार क्षेत्राबाबतच खूप कमिट्या बनल्या आहेत आता केंद्र सरकार नवीन कमिटी बनवणार नाही, असे सांगत लवकरच नवीन सहकार नीती तयार केली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच सहकार विद्यापीठदे खील स्थापन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येऊन काम करू असे आवाहनही अमित शाह यांनी केले. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते.