होळी लहान करा, पोळी दान करा: अनिसचा उपक्रम
X
आतापर्यंत होळी मध्ये दरवर्षी अनेक पुरण पोळ्या नैवेद्याच्या रुपात जळल्या असल्या तरी, "या होळीला मात्र आपली गोड पुरण पोळी कुणाची तरी भूक भागवेल असा निर्धार करूयात." या उपक्रमाअंतर्गत होळी लहान करा, कचऱ्याची करा, दुर्गुणांची करा हे आवाहन अंधश्रध्दा निर्मुलन समिती (अंनिस)तर्फे केले गेले आहे.
होळी सण रंगांचा, सण नात्यांचा, दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचं निर्दालन करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा असतो. त्यामुळे तो पर्यावरण पूरक साजरा करावा. तसेच होळी लहान करा, पोळी दान करा असे आवाहनवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रायगड मार्फत करण्यात आले आहे.
दरवर्षी रायगड जिल्ह्यात महा. अंनिसच्या या अभियानास मोठा पाठिंबा मिळतांना दिसत आहे. मागिल वर्षी सुधागड तालुक्यात पाली, अलिबाग, पेण, खोपोली, नागोठणे अशा अंनिस वेगवेगळ्या शाखेच्या वतीने होळी लहान करा, पोळी दान करा या आव्हानाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. अनेक हितचिंतक व सामाजिक संघटनांनी देखील या उपक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी हजारो पोळ्या जमा झाल्या होत्या. या सर्व पोळ्या अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी वाड्यांवर नेऊन वाटुन गोरगरिबांची होळी गोड केली.
होळीत पूरण पोळी टाकण्याऐवजी ती बाजुला काढून ठेवा, कोरडी राहिल असे पहा, एका कोरड्या खोक्यात, डब्यात गोळा करा. आणि आपल्या गावातील कोणत्याही अंनिस कार्यकर्त्याला आणून द्या. त्या पोळ्या त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी गरीब वस्त्यांवर जाऊन हे कार्यकर्ते वाटणार आहेत. 'पोळी वाटणे' हा उपक्रम कोणीही एखादी गरीब वस्ती निवडून त्यांच्या पातळींवर करू शकतात. मार्गदर्शन मिळविण्यासाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांना संपर्क करू शकता. बळीराजाच्या अपार कष्टाने मिळवलेले अन्न त्याची मेहनत वाया न जाऊ देता कोणाच्यातरी मुखी लागले पाहिजे. त्याच्या मेहनतीची राख व्हायला नको. आपण एवढे संवेदनशील तर नक्कीच आहोत. तुम्ही तुमच्या मंडळाच्या, वाडीतल्या, वस्तीतल्या पोळ्या देण्यासाठी संपर्क साधू शकता.
असे आवाहन जिल्हा अंनिसतर्फे केले आहे. संपर्क जिल्हा कार्याध्यक्ष - मोहन भोईर - 8411051492, अध्यक्ष - विवेक सुभेकर - 9270499113, जिल्हा प्रधान सचिव - संदेश गायकवाड - 8796068476, जिल्हा बुवाबाजी संघर्ष प्रमुख अमित निंबाळकर - 9273790850 यांना संपर्क करावा.
-अशी साजरी करा होळी आणि धुलिवंदन
होळीसाठी झाडे तोडू नका
अनेक ठिकाणी होळी पेटविण्या ऐवजी गावात एकाच ठिकाणी प्रतीकात्मक होळी पेटवा.
होळीनिमित्त बोंबा मारणे, अपशब्द उच्चारणे यापासून कटाक्षाने लांब रहा.
होळीमध्ये पोळी जाळण्याऐवजी ती पोळी गरजूंना द्या.
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कोरड्या रंगानी होळी/रंगपंचमी खेळा.
होळीमध्ये प्लास्टिक, टायर सारखे हानिकारक वस्तू जाळू नका.
होळी/रंगपंचमी साठी पर्यावरण-स्नेही रंग किंवा नैसर्गिक रंगांचा वापर करा.
रंगांचा सण साजरा करतानाच पर्यावरणाची ही काळजी घेऊयात.