आपल्या मानधनातून मतदारसंघातील दिव्यांग बांधवांचा विमा काढणार- खा.हेमंत पाटील
X
आपल्याला मिळणाऱ्या खासदारकीच्या मानधनातून हिंगोली लोकसभा मतदार संघातील दिव्यांग बांधवांचा विमा काढणार असल्याची घोषणा हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आज केली आहे. खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्यावतीने आज हिंगोली जिल्ह्यातील तीन हजार दिव्यांग बांधवांना दोन कोटी 77 लाख रुपये किंमतीचे विविध साहित्य वितरित करण्यात आले. हिंगोली व सेनगाव असे दोन ठिकाणी आज विशेष शिबिराचे आयोजन करून इलेक्ट्रिक ट्राय सायकल्स, श्रवणयंत्रे, स्मार्ट टॅब आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे.
हिंगोली लोकसभा मतदार संघातील ज्या दिव्यांग बांधवांनी विविध वित्तीय महामंडळांची उद्योगासाठी कर्ज घेतले आहेत, त्यांना महामंडळांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये, अशा सूचना यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी केल्या आहेत. दिव्यांग बांधवांना मिळालेल्या विविध साहित्यामुळे दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
दरम्यान, शासनाकडून दिव्यांग बांधवांना मिळणारे मानधन हे अतिशय कमी असून ते वाढवून मिळण्यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विनंती करणार असल्याचे खासदार पाटील यांनी म्हटले अशे. तसेच कोरोना काळात अनेक दिव्यांग बांधवांचे बँक कर्जाचे हफ्ते थकले आहेत, त्यामुळे बँक अधिकारी वसुलीसाठी त्यांच्याकडे तगादा लावत आहेत त्यांना देखील आम्ही सूचना केल्या आहेत की, कोरोना प्रादुर्भाव कमी होत आहे त्यामुळे या दिव्यांग बांधवांचे व्यवसाय पूर्वपदावर येत आहेत त्यांना कर्ज वसुलीसाठी तगादा न लावता थोडा वेळ द्यावा ते अतिशय प्रामाणिक आहेत ते कर्ज फेडतील असं पाटील म्हणाले.