रायगडात अतिवृष्टीचा पहिला बळी, अलिबाग येथील मच्छिमार गेला वाहून
X
9 ते 12 जून पर्यंत कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अशातच सलग दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यात पहिला बळी गेल्याची नोंद झालीय. अलिबाग येथे एक मच्छिमार वाहून गेल्याची घटना आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. जेएसएम कॉलेजच्या मागे त्याचा मृतदेह आढळून आला आहे. दिनेश हरी राक्षीकर असे त्याचे नाव आहे.
अलिबाग कोळीवाडा येथे राहणारा दिनेश राक्षीकर हा आज (9 जून) कुलाबा किल्ल्याजवळच्या कातळावर खुब्या काढायला गेला होता. भरतीचे पाणी वाढल्याचे लक्षात आले नाही, त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला. त्याचा मृतदेह जेएसएम कॉलेजच्या मागील किनार्यावर लागला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. असे असतानाही पोटापुरती मच्छी मिळवण्यासाठी दिनेश गेला आणि जीव गमावून बसला.