Home > News Update > रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती, अनेक गावं संपर्काबाहेर

रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती, अनेक गावं संपर्काबाहेर

रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती, अनेक गावं संपर्काबाहेर
X

रायगड - रायगड जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्याने मुख्य महामार्गासह अनेक गावांना जोडणाऱ्या नदी पुलांवरून पाणी जाऊ लागले आहे. डोंगर दऱ्याखोऱ्यातून आणि माळरान पठारावरून आलेला वेगवान पाण्याचा प्रवाह येथील नद्यांना मिळाल्याने अनेक ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

पाली खोपोली मार्गावरील पाली अंबा नदी पुलावरुन पाणी गेल्याने दोन्ही बाजुची वाहतूक खोळंबली आहे. नवीन पुलाचे काम अपूर्ण असल्याने नागरिक, प्रवासी, विद्यार्थी यांना पुन्हा एकदा त्रासाला सामोरे जावे लागले. सुधागड तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा आणि रहदारी व वाहतुकीसाठी महत्वाचा असलेल्या भेरव पुलावरून देखील पाणी वाहू लागल्याने सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सभोवतालच्या गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. खालापूर तालुक्यातील खोपोली - पाली रस्त्यापासून तुकसई गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अंबा नदीवर असणाऱ्या छोट्या पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तुकसई व भेरव पुलालगत व सभोवताली अनेक गावे व आदिवासी वाड्या असल्याने येथील नागरिकांशी संपर्क तुटला आहे.

भेरव गावच्या जवळपास वाघोशी, कवेळे, आवंढे, महागाव, चंदरगाव, हातोंड, पडसरे, तसेच भोप्याची वाडी, चंदर गाव बौद्धवाडी, महागाव बौद्धवाडी, आसरे, उद्धर आदींसह गावे व आदिवासी वाड्याना जोडणाऱ्या भेरव पुलावर पाणी असल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. त्यातच वीज पुरवठा खंडीत झाल्याने या लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्याव भारतीय हवामान खात्याने पुढील तीन दिवस रायगडसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दरडग्रस्त व नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच नदी पुलांच्या दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी अतिवृष्टी काळात खबरदारी घ्यावी, धोक्याच्या ठिकाणी जाऊ नये, कामाशिवाय बाहेर पडू नये, कोणतीही आपत्ती जाणवल्यास तात्काळ स्थानिक व तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केले आहे.

Updated : 12 July 2022 4:36 PM IST
Next Story
Share it
Top