महाराष्ट्रात कोरोनाचा नवा घातक व्हेरिएंट?; आरोग्य मंत्री टोपे म्हणाले...
X
राज्यात कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरली असली तरी अनेक तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला आहे. त्यातच कोरोनाच्या नव्या AY.4 या व्हेरिएंटचे (Coronavirus AY.4 Variant) रुग्ण महाराष्ट्रात आढळल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र , आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. महाराष्ट्रात अद्याप कोरोनाच्या या व्हेरिएंटनचा शिरकाव झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
'महाराष्ट्रात कोरोनाच्या AY.4 व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. हा शिरकाव महाराष्ट्रात होऊ नये यासाठी आरोग्य विभागाला योग्य सूचना केल्या जातील,' असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. ते जालन्यात बोलत होते.
केंद्राच्या टास्क फोर्सने जलदगतीने लसीकरण करण्याच्या सूचना राज्यांना दिल्या असून, मिशन कवचकुंडल अंतर्गत महाराष्ट्रात दिवाळीपर्यंत वेगाने लसीकरण केलं जाणार असल्याचं टोपे यांनी म्हटले आहे. लसीकरण वेगाने होण्यासाठी आणखी काही विभागांची मदत घेतली जात असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली.
दरम्यान, 'सध्या कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर 84 दिवस इतकं आहे. या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा केंद्र सरकारचा मानस नाही, त्यामुळे हे अंतर आहे तसंच कायम राहील,' असंही ते म्हणाले.