UAPA कायद्याबाबत हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाची वेगळी भूमिका
X
दिल्ली दंगल प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या नताशा नरवाल, देवांगना कलिता आणि आसीफ इक्बाल तन्हा या तीन विद्यार्थी कायकर्त्यांना दिल्ली हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. पण यानंतर दिल्ली पोलिसांनी या जामिनाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. यावरील सुनावणी शुक्रवारी झाली. पण या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने UAPAबाबत हायकोर्टाने ओढलेल्या ताशेऱ्यांवरुन वेगळी भूमिका मांडली. त्याचबरोबर 3 विद्यार्थी कार्यकर्त्यांच्या जामिनाबाबत आम्ही हस्तक्षेप करत नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे या तिन्ही विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण कोर्टाने दिल्ली पोलिसांच्या याचिकेवर नोटीस बजावली आहे आणि चार आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश कोर्टाने दिलेत.
दरम्यान दिल्ली हायकोर्टाने UAPA कायद्याचा काढलेला अर्थाचा इतर कोणत्याही खटल्यांमध्ये वापर करता येणार नाही, असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणावर अंतिम सुनावणी होईपर्यंत UAPA कायद्या संदर्भातील हायकोर्टाच्या निर्णयाचा दाखला इतर कोणत्याही खटल्यात कोणत्याही पक्षाला देता येणार नाही.