योगी सरकारमध्ये जातीय अत्याचाराचे सत्र सुरुच, रस्त्यात अडवून नाक रगडायला लावले...
X
उत्तर प्रदेशचे योगी सरकार किती दावे करत असले तरी उत्तर प्रदेशमध्ये दलितांवर अत्याचार थांबताना दिसत नाही. अलिगढ येथे दलित बाप लेकाचा छळ केल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे.
गावातील अर्धा डजन गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बाप लेकाचा छळ केल्याची घटना घडली आहे. विशेष बाब म्हणजे घटना घडल्यानंतर देखील स्थानिक पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. अखेर पीडित व्यक्तींनी पोलिस अधिक्षकांकडे विनंती केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिगड जिल्हातील नंगला डाकूर गावामध्ये हे प्रकरण घडलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दलित समाजातील बाप लेक काही कामानिमित्त घराबाहेर पडले होते. येताना कोतवाली इगलास भागात असणाऱ्या मई गावात राहणाऱ्या अर्धा डजन पेक्षा जास्त गुंडांनी बाप लेकांना थांबवलं.
पीडित व्यक्तींनी केलेल्या आरोपानुसार गुंडांनी यांना अडवल्यानंतर या बाप लेकाला जातीवरून अपमानित केलं. त्यानंतर त्यांना मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडित व्यक्तीला आपल्या मुलासमोर या लोकांचे पाय पकडायला भाग पाडलं. तसंच या गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या समोर नाक घासायला लावलं.
कोतवाली इगलास भागात असणाऱ्या गाव नगला डागुर येथे राहणाऱ्या गुरु दयाल यांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपुर्वी 8 एप्रिल ला पीड़ित आपल्या वडिलांसोबत घरी जात होता. तेव्हा रस्त्यामध्ये शेजारच्या गावातील ओमवीर त्याच्यासोबत असलेल्या सात लोकांनी त्यांना अडवलं. त्यांना जातीवाचक शब्दांनी अपमानीत केलं. मारहाण केली, तसंच त्याच्या वडिलांना पाय पकडायला भाग पाडलं. या लोकांसमोर जमिनीवर नाक घासायला लावलं.
आता पीडित व्यक्तीने दिलेल्या तक्रारी नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. या संदर्भात janwar.com या वेबसाईटने वृत्त दिलं आहे.