कुमार केतकर यांच्या पंचाहत्तरीनिमित्त 'ग्रंथाली'ची साहित्यठेव !
ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर हे ७ जानेवारी रोजी वयाची पंचाहत्तरी पूर्ण करत आहेत. यानिमित्त ग्रंथाली प्रकाशनने एक साहित्यरुपी भेट तयार केली आहे. हा विशेष सोहळा मॅक्स महाराष्ट्रवर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
X
मुंबई- ज्येष्ठ पत्रकार, राज्यसभेचे खासदार आणि 'ग्रंथाली'चे संस्थापक सदस्य कुमार केतकर यांचा 7 जानेवारी रोजी वाढदिवस आहे. कुमार केतकर हे वयाची पंचाहत्तरी पूर्ण करत असून 'ग्रंथाली'ने त्यानिमित्ताने 'प्रज्ञा, प्रतिभा, प्रगल्भता' हे सूत्र धरून 'शब्द रुची'चा विशेषांक तयार केला आहे. प्रल्हाद जाधव यांनी या अंकाचे संपादन केले आहे.
कोरोना काळातील निर्बधांमुळे हा प्रकाशन सोहळा ऑनलाईन होणार आहे. ग्रंथालीचे संस्थापक सदस्य दिनकर गांगल, 'प्रथम'चे संस्थापक माधव चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, 'साधना'चे संपादक विनोद शिरसाठ, पत्रकार अलका धुपकर, सीए डॉ. अजित जोशी, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. कुमार केतकर यांच्या मनोगताने या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. हा कार्यक्रम ग्रंथालीच्या (granthali watch) फेसबुक पेजवर आणि मॅक्स महाराष्ट्राच्या युट्यूब आणि फेसबुक पेजवर 7 जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता प्रसारित होईल.
जानेवारी 2021चा 'शब्द रुची' अंक आणि कुमार केतकर यांनी लिहिलेल्या लेखांमधील निवडक लेखांचे संकलन असलेले 'व्यासंग आणि विचार' या दोन पुस्तकांचेही प्रकाशन या कार्यक्रमात केले जाणार आहे. या अंकात डॉ. अनिल काकोडकर, सॅम पित्रोदा, सुनील देशमुख, संदीप वासलेकर, कलापिनी कोमकली, गणेश देवी, वालप्पा बालचंद्रन अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींची मनोगते असून भाषातज्ज्ञ डॉ.गणेश देवी यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.
'शब्द रुची'चा विशेषांक व 'व्यासंग आणि विचार' हे पुस्तक याचे केवळ 75 संच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. प्रथम नोंदवणार्यास प्रथम यानुसार 200 रुपये किंमतीचा हा संच घरपोच दिला जाईल. त्यासाठी पुढील मोबाईलवर क्रमांकावर (9004949656) व्हॉट्सअप मेसेजद्वारे आपली मागणी नोंदवावी, असे आवाहन धनश्री धारप यांनी केले आहे.