Home > News Update > ग्रामसभा सुरु होणार, काय असणार नियम?

ग्रामसभा सुरु होणार, काय असणार नियम?

ग्रामसभा सुरु होणार, काय असणार नियम?
X

राज्यात नुकत्याच ग्रामपंचाय निवडणुका पार पडल्या. त्यानंतर आता राज्यसरकारने कोरोनामुळे स्थगित केलेल्या ग्रामसभा पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी शासनाने सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड १९ च्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितलं आहे. यासंदर्भात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माहिती दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जानेवारीमध्ये ग्रामसभा सुरु करण्यास संमती देण्यात आली होती. पण, दरम्यानच्या काळात कोरोना विषाणुचा नवा स्ट्रेन (प्रकार) आढळल्याने दक्षता म्हणून ग्रामसभांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.

ग्रामसभेच्या मंजुरीअभावी वार्षिक विकास आराखडे, शासनाच्या विविध योजनांतर्गत वैयक्तिक लाभार्थांची यादी, पुनर्वसित गावांचे प्रस्ताव, गौण खनिज परवानगी, थेट सरपंच विरुध्दातील अविश्वास प्रस्ताव, चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करणे इत्यादी बाबी प्रलंबित राहिलेल्या आहेत. तसेच, कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव देखील आता कमी झाला असून जनजीवन पूर्ववत होत आहे. या बाबी विचारात घेऊन कोविड - १९ च्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात येत आहे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३ ) च्या कलम ७ नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात निदान चार ग्रामसभांचे आयोजन बंधनकारक आहे. तथापी, कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेले आदेश, अधिसूचना यानुसार सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय सभा व संमेलनांवर बंदी घालण्यात आली होती. त्याचप्रमाणे ग्रामसभा घेण्यास तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली होती.

तथापी, सद्यस्थितीत कोविडच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळातील निर्बंधांमध्ये शिथिलता येत असून बहुतांश जनजीवन पूर्ववत होत असल्याने ग्रामसभांच्या आयोजनास देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक आज निर्गमित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

Updated : 12 Feb 2021 11:46 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top