Home > News Update > मजरे जांभुळपाडा गावच्या सामूहिक वनहक्क संवर्धन, व्यवस्थापन आराखड्यास ग्रामसभेची मंजूरी

मजरे जांभुळपाडा गावच्या सामूहिक वनहक्क संवर्धन, व्यवस्थापन आराखड्यास ग्रामसभेची मंजूरी

मजरे जांभुळपाडा गावच्या सामूहिक वनहक्क संवर्धन, व्यवस्थापन आराखड्यास ग्रामसभेची मंजूरी
X

वनविभाग अलिबाग, प्रांत कार्यालय रोहा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेन व सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभूळपाडा यांच्या समन्वयाने सुधागड तालुक्यातील मजरे जांभुळपाडा या गावाचा पहिला सामूहिक वनहक्क संवर्धन,व्यवस्थापन आराखड्यास ग्रामसभेची मंजूरी मिळाली आहे.यावेळी उपस्थित असलेल्या प्रांताधिकारी तथा उप विभागस्तरीय वनहक्क समिति, सुधागड चे अध्यक्ष अरुण उंडे, म्हणाले की “लोकांना शत्रू मानून जंगलांचे शाश्वत नियोजन करता येणार नाही त्यासाठी स्थानिक लोक समुदायाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.

“स्थानिक आदिम लोकसमुदाय,उप वनसंरक्षक कार्यालय अलिबाग, प्रांत कार्यालय रोहा, वन विभाग,सुधागड यांच्या सक्रिय सहभागातून संपूर्ण रायगड जिल्ह्यात वनसंवर्धनाचा पथदर्शी प्रयोग सुरु असून या प्रयोगातून राज्याच्या वन धोरणाला दिशा मिळणार असल्याचा विश्वास वातावरण फाऊंडेशनचे कॅम्पेन आणि प्रोग्राम्स प्रमुख राहुल सावंत यांनी व्यक्त केला. पर्यावरणाची पडझड होत असणाऱ्या काळात मजरे जांभुळपाडा या गावच्या सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीने वन व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा तयार करून वन संवर्धनाच्या दिशेने टाकलेले पाऊल महत्वाचे आहे. स्थानिक आदिम आदिवासी व इतर लोकसमुदाय एकत्रित या मोहिमेत उतरला आहे ही महत्वाची बाब आहे. जंगलांच्या शास्त्रीय व्यवस्थापना करिता वन विभागाच्या मार्गदर्शनात जंगलात शिवार फेरी करून सुक्ष्म नियोजन दर्शविणारा रिसोर्स मॅप तयार केला.ही कृती संपूर्ण रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच आमच्या ग्रुप ग्रामपंचायत चिवे हद्दीतील सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभुळपाडा, ने केली, एवढेच नव्हे तर वनांचे शाश्वत नियोजन करून त्याचा आराखडाही आज या समितीने विशेष ग्रामसभे समोर सादर केला आहे. या आराखड्याला आज आमच्या विशेष ग्रामसभेत एक मताने मंजूरी दिली आहे. कोणीही विरोध केला नाही. याचाच अर्थ वनांच्या रक्षणासाठी आमच्या ग्राम पंचायत हद्दीतील सर्व नागरिक तयार आहेत. हा आदर्श इतरांनीही घ्यावा. असे मत ग्रुप ग्राम पंचायत चिवेचे सरपंच रोहिदास साजेकर यांनी व्यक्त केले.







काल गट ग्रामपंचायत चिवे येथे सामूहिक वनहक्क मान्यता प्राप्त मजरे जांभुळपाडा या गावाचा सामूहिक वन व्यवस्थापन आराखडा मंजूर करण्यासाठी विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेस १५० हून अधिक लोकांनी हजेरी लावून एकमताने मजरे जांभूळपाडा या गावाच्या सामूहिक वनहक्क संवर्धन व वनव्यवस्थापन आराखड्यास मंजुरी दिली. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ म्हणजेच वनहक्क कायदा २००६ (वहका २००६) चे कलम ३(१) अंतर्गत मजरे जांभुळपाडा या गावाला २०१९ साली १३९.३५ एकर इतक्या वन क्षेत्रावर सामुहिक वनहक्काचे आधिकार प्राप्त झाले आहेत. या हक्काअंतर्गत गावाच्या सीमांतर्गत किंवा सिमाबाहेर पारंपारिक रित्या गौण वनउपज गोळा करणे, त्यांचा उपयोग, संग्रह व विक्री करणेसाठी स्वामित्वाचे आधिकार मान्यता प्राप्त झाले आहेत.





आमच्या गावाला सामूहिक वनहक्क प्राप्त झाला आहे. त्यामुळे आमची आणि रानाची/ जंगलाची स्थलांतरांमुळे तुटत चाललेली नाळ पुनः घट्ट होत आहे. आम्ही आमच्या हक्काच्या रानाची/ जंगलाची काळजी घेण्यासाठी आराखड्यामध्ये नियम बनवले आहेत. त्या नियमानुसार कोणालाही जंगलाचे नुकसान करून देणार नाही. कमी होत असलेल्या जंगलाचे प्रमाण वाढवण्याचा आम्ही एकजुटीने पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी वन संवर्धन व व्यवस्थापनाची मोहीम वातावरण फाऊंडेशनच्या सहकार्याने आम्ही हाती घेतली आहे. वनांनचे व्यवस्थापन करणे म्हणजे काळानुरूप, ऋतु निहाय वनांचे संरक्षण करण्यासाठी तत्पर असणे होय. असे मत सुभाष जाधव, सचिव, सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभूळपाडा यांनी व्यक्त केले. जसे लहान बाळाला काय हवं नको ते आपण पाहतो तसेच जंगले टिकण्यासाठी त्यात वाढ होण्यासाठी रानाच्या / जंगलाच्या कोणत्या क्षेत्रांवर कायकाय आणि कोणकोणते उपचार करणे गरजेचे आहे हे ठरवणे होय. आम्ही पुढील तीनवर्षे म्हणजे २०२४ ते २०२७ या कालावधीत जंगल वाढीसाठी कायकाय करणार आहोत याचे कालबद्ध नियोजन केले आहे. असेही जाधव म्हणाले. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात पहिल्यांदाच सामूहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला. या विशेष ग्रामसभेला अमृता सुतार, नायब तहसीलदार, प्रांताधिकारी कार्यालय, रोहा, प्रज्ञा राजमाने, नायब तहसीलदार (महसूल), प्रांताधिकारी कार्यालय, रोहा, रोहिदास साजेकर, सरपंच ग्रूप ग्रामपंचायत, चिवे, अरविंद ठाकूर, उपसरपंच ग्रूप ग्रामपंचायत, चिवे, ग्रामपंचायत सदस्य, अमोल वारुळे, एकात्मिक आदिवासी विकास विभाग, पेन, आव्हाड सर, विस्तार अधिकारी, कृषी विभाग,संकेत गायकवाड, वनरक्षक, चिवे इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ या ग्रामसभेस उपस्थित होते.

Updated : 20 Jan 2024 6:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top