#MaxMaharashtraImpactशेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी ९८ कोटींचा तातडीचा निधी
X
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी ९८ कोटींचा तातडीचा निधीचालू हंगामामध्ये लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायींमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने सरकारने तातडीने उपाययोजना केली आहे. ९८ कोटी ५८ लाख रूपयांच्या मदतीला सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या विविध नैसर्गिक आपत्तींमध्ये पेस्ट अटॅक म्हणजे किटकांचा हल्लाही अंतर्भूत करण्यात आला आहे. त्यानुसार गोगलगायींचा उपद्रव हा पेस्ट अटॅक असल्याने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाने आधी घेतला होता.
मॅक्समहाराष्ट्रने यासंदर्भात सर्वप्रथम वृत्त दिले होते. गोगलगायींमुळे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झा-लेल्या शेतीपिके/फळपिकांच्या नुकसानीसाठी 3 हेक्टरपर्यंतही नुकसानभरपाई मिळणार आहे. नुकसान भरपाईच्या या संपूर्ण प्रक्रियेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे स्वतः लक्ष ठेवून आहेत. होत असलेल्या मदतकार्याचा दररोज आढावा घेतला जाणार आहे.
लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून ९८ कोटी ५८ लाख इतका निधी वितरीत करण्यासाठी मंजूरी देण्यासंदर्भात जीआर जारी करण्यात आला आहे. त्यानुसार विभागीय आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भातील NDRF च्या निकषांमध्ये बदल करून दुप्पट दराने मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, याच निर्णयाच्या अनुषंगाने गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात वाढीव दर निर्धारित करण्यात आले आहेत. तीन जिल्ह्यांमधील सुमारे १ लाख १८ हजार ९९६ शेतकऱ्यांना या योजनेतून मदत मिळणार आहे. गोगलगायींमुळे एकूण ७२ हजार ४९१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.