शरद पवारांच्या आधी पुतळ्याचे अनावरण, गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा
X
पुणे - राज्यात पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष निर्माण झाला आहे. जेजुरी इथे अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचा शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार होता. मात्र,त्याआधीच गोपीचंद पडळकरांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा उरकला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते १३ तारखेला पुतळ्याच्या अनावरणाचे नियोजन करण्यात आले होते.
पण त्याआधीच पडळकरांनी शुक्रवारी पहाटे या पुतळ्याच्या अनावरणाचा प्रयत्न केला. तसेच यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप देखील केले. यावेळी पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान या प्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर जेजुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान यासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन गोपीचंद पडळकर यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली आहे. तसेच या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे शरद पवार यांच्या हस्ते होईल असेही सांगण्यात आले आहे.