एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांकडून महागाई भत्त्यात वाढ
X
राज्य मार्ग परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा माहागाई भत्ता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.
गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मान्यता दिली. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरुन ३८ टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सुमारे ९० हजार अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर ९ कोटी रुपयांचा बोजा पडेल. त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना २०३ टक्क्यांवरून वाढवून २१२ टक्के महागाई भत्ता देण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.